कोल्हापूरच्या युवकांनी कोल्हापुरातच करावा रोजगार; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन
schedule03 Apr 25 person by visibility 373 categoryराज्य

▪️कोल्हापुरातील एमआयडीसीत मिळणार मुंबई, पुण्याप्रमाणे सोयीसुविधा
▪️रोजगार निर्मितीचा सर्वसमावेशक आराखडा तयार करुन रोजगार मेळावा घेण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
कोल्हापूर : मुंबई, पुण्यातील एमआयडीसी मध्ये मिळणाऱ्या सोयी सुविधा कोल्हापुरातील कागल, गोकुळ शिरगाव, शिरोली, हातकणंगले एमआयडीसीत मिळण्यासाठी कामगार विभाग, एमआयडीसी, कौशल्य विकास विभाग आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी याठिकाणच्या रिक्त जागा व त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा आदी सर्वसमावेशक माहितीवर आधारित आराखडा तयार करुन भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करावे, अशा सूचना देवून असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
100 दिवसांचा कार्यालयीन सुधारणा विशेष कामगार संघटनांच्या मोहिम अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय व कामगार आयुक्त कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने "जिल्ह्यातील कामगार संघटनांशी चर्चा सत्र व उद्योगाच्या अडचणींच्या निराकरणाबाबत कामगार संघटनांचे प्रतिनिधी व उद्योजकांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी कोल्हापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके, इचलकरंजीच्या सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे तसेच जिल्ह्यातील विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी व उद्योजक उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा बालकामगार मुक्त करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी बालकामगार आढळल्यास याची माहिती सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयास कळवावी, असे आवाहन करुन जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, जिल्ह्यातील उद्योगधंद्यात वाढ होण्याबरोबरच कामगारांचे कल्याण साधण्यासाठी कामगारांशी संबंधित जिल्हा पातळीवरील प्रश्न जिल्हा प्रशासन प्राधान्याने सोडवेल तर शासन स्तरावरील प्रश्न शासनाला सादर करण्यात येतील. विविध उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेला उद्योजकांनी प्राधान्य द्यावे. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृतीपर शिबीर घेण्यासाठी नियोजन करा, उद्योग क्षेत्रांच्या आवारात, एमआयडीसी परिसरात बचत गटांच्या माध्यमातून माफक दरात भोजन व्यवस्था देण्याबाबत प्रयत्न करा. इंडस्ट्री ऑडिट, विमा, फायर सेफ्टी, कारखाने कंपन्यांमधील सुरक्षितता, कामगार व त्यांच्या मुलांचे आरोग्य, शिक्षण, रात्रीच्या वेळी परगावाहून येणाऱ्या कामगारांसाठी निवास व्यवस्था, उन्हाळ्यात अचानक आपत्ती ओढवू नये यासाठी खबरदारी, हजेरी पत्रक, पगार पत्रक, अंतर्गत रस्ते आदी विषयी जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी उद्योजकांची व कामगार प्रतिनिधींशी संवाद साधला.
यावेळी उद्योजकांच्या अडचणी व त्यांचे प्रश्न जिल्हाधिकारी येडगे यांनी समजावून घेतले. कुशल मनुष्यबळाची जिल्ह्यात कमतरता असून अभियांत्रिकी पदवी, आयटीआय, होल्डर, 10 वी, 12 वी शिकलेल्या तरुण युवकांची उद्योग कंपन्यांना आवश्यकता असून जिल्ह्यातील अभियंते, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थी शिक्षित तरूण युवकांचा नोकरीसाठी पुण्याला प्राधान्य असल्याचे उद्योग प्रतिनिधींनी सांगितले. यावर जिल्हाधिकारी यांनी ‘कोल्हापूरातच शिका व येथेच रोजगार मिळवा’ ही संकल्पना मांडली व त्यासाठी मुंबई, पुण्यात देण्यात येत असलेल्या आवश्यक त्या पायाभूत सुविधा कोल्हापुरातील कामगारांना उपलब्ध करुन देण्याचे आवाहन उद्योजकांना केले. यामध्ये घर ते कामाचे ठिकाण यामध्ये वाहतूक व्यवस्था, कामगारांना कॅन्टीन सुविधा द्या. जिल्ह्यातील कुशल मनुष्यबळ जिल्ह्यातच राहण्यासाठी कौशल्य विकास विभाग, औद्योगिक सुरक्षा संचलनालय, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयांनी याविषयी नियोजनबद्ध आराखडा तयार करुन अंमलबजावणी करावी. त्याचे सादरीकरण व याची प्रसिध्दी आयटीआय कॉलेज,अभियांत्रिकी कॉलेज मध्ये करावी, असे निर्देष जिल्हाधिकारी यांनी दिले.
या बैठकीत कामगार संघटना प्रतिनिधीनी कामगारांना येणाऱ्या अडचणी मांडल्या. कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळावे, भविष्य निर्वाह निधीचे लाभ मिळावेत. जिल्ह्यातील (ESIC) हॉस्पिटल मध्ये डॉक्टर, कर्मचारी यांची भरती व्हावी, असे आवाहन संघटनांनी केले. यंत्रमाग कामगारांचे प्रश्न इचलकरंजीच्या संघटनांनी मांडले, साखर उद्योगातील कामगारांना शासनाच्या त्रियपक्षीय करारा नुसार वेतन देण्याची मागणी साखर कामगार संघटनेद्वारे करण्यात आली.