शाश्वत विकासाद्वारे राष्ट्रनिर्मितीत युवकांनी योगदान द्यावे : सिद्धार्थ शिंदे
schedule03 Apr 25 person by visibility 191 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शाश्वत विकासाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती करण्याच्या कामी युवकांनी योगदान द्यावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य सिद्धार्थ शिंदे यांनी आज येथे केले.
विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागात ई-कचरा व्यवस्थापन केंद्राद्वारे ”शाश्वत विकास” या विषयावर शिंदे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अधिविभाग प्रमुख डॉ. पवन गायकवाड अध्यक्षस्थानी होते.
ते म्हणाले, तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात शाश्वत विकासाकडे लक्ष द्यायला हवे. इलेक्ट्रॉनिक्स विषयाच्या विद्यार्थ्यांना शाश्वत विकासाच्या अनुषंगाने संशोधन करण्याच्या अनेक संधी उपलब्ध असून त्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. शैक्षणिक संस्थांनी जास्तीत जास्त विद्यार्थीकेंद्री धोरणे अवलंबण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. गायकवाड यांनी शाश्वत विकास हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी शिंदे यांनी ई-कचरा व्यवस्थापन केंद्राची पाहणी केली. संजीवनी कदम यांनी सूत्रसंचालन केले तर ई-कचरा व्यवस्थापन केंद्राचे समन्वयक डॉ. मुरलीधर भानारकर यांनी आभार मानले.