पन्हाळ्यावरील शिवस्मारक कामाचा सुधारित आराखडा येत्या आठ दिवसांत, तर गगनबावडा तालुका पर्यटनाचा सूक्ष्म आराखडा महिन्याभरात सादर करा : अमोल येडगे
schedule03 Apr 25 person by visibility 335 categoryराज्य

▪️आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध बैठका संपन्न
▪️बालिंगा - दाजीपूर रस्त्याची कामे जलद गतीने पूर्ण करा
कोल्हापूर : पन्हाळा येथील ऐतिहासिक शिवतीर्थ तलावातील शिवस्मारकाजवळील बगीच्या, पदपथ व अनुषंगिक कामांचा सुधारित आराखडा येत्या आठ दिवसांत तर गगनबावडा पर्यटनाचा सूक्ष्म आराखडा महिन्याभरात जिल्हा प्रशासनाकडे सादर करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत पन्हाळा नगर परिषदेला दहा कोटी रुपयांचा निधी पन्हाळा नगरपरिषद हद्दीतील ऐतिहासिक शिवतीर्थ तलावातील शिवस्मारका जवळील बगीच्या पदपथ व अनुषंगिक कामे करण्यासाठी नुकताच मंजूर झाला आहे या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाबाबत तसेच गगनबावडा तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्याच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय पर्यटन स्थळ व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.
यावेळी गगनबावडा पर्यटन विकास आराखडा व बालिंगा रस्त्याच्या कामाबाबतच्या आढावा बैठका घेण्यात आल्या.
बैठकीला उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ.संपत खिलारी, कागल राधानगरीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, भूसंपादन समन्वय विवेक काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड तसेच महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ, वन व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, नगर विकास विभागाने पन्हाळ्यावरील ऐतिहासिक शिवतीर्थ तलावातील शिवस्मारकाच्या कामासाठी दिलेल्या दहा कोटी रुपयांच्या निधीतून करावयाची कामे लवकरात लवकर सुरु होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. या ठिकाणी तयार करण्यात येणाऱ्या पुतळ्याचा चबुतरा मजबूत बनवा. शिवरायांचा पुतळा स्फूर्तीदायक व तेजस्वी असा तयार करुन घ्या. या ठिकाणी लेझर शो होण्यासाठीचा समावेश आराखड्यात करावा. आवश्यकता भासल्यास वाढीव निधी मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
गगनबावडा परिसरात पावसाळ्यात देशभरातील पर्यटकांचा ओढा असतो. या भागाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी निवास व न्याहारीची चांगल्यात चांगली व्यवस्था होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी गगनबावडा तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित करणे आवश्यक आहे. या भागात असणारी पर्यटन स्थळे व त्या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सुविधा आदी माहितीचा समावेश पर्यटन आराखड्यात करावा, असे आमदार नरके यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, पन्हाळगडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या पाहता या ठिकाणी असणाऱ्या ऐतिहासिक शिवतीर्थ तलावात शिवस्मारक, बगीच्या व पदपथाची कामे जलद गतीने होणे आवश्यक आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व पाणीपुरवठा विभागाने या ठिकाणाला भेट देऊन या ठिकाणी करण्यात येणाऱ्या कामांचा अभ्यास करावा पूर्वी झालेल्या कामांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. आजच्या बैठकीत सुचवण्यात आलेल्या कामांचा समावेश करुन सुधारित आराखडा येत्या आठ दिवसात जिल्हा प्रशासनाकडे सादर करुन प्रशासकीय मान्यतेसाठी दोन आठवड्यात द्यावा. जेणेकरून मे अखेर काम सुरु होऊन जलद गतीने पूर्ण होईल.
गगनबावडा तालुक्यातील नैसर्गिक ऐतिहासिक धार्मिक व निसर्गरम्य पर्यटन स्थळांना देशातील व परदेशातील पर्यटक भेट देतात. वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमटीडीसी, जलसंपदा आदी विभागांनी गगनबावडा तालुक्यातील विविध पर्यटन स्थळांना येत्या 8 दिवसांत भेटी देऊन त्या त्या ठिकाणांच्या पर्यटन विषयक माहितीवर आधारित सूक्ष्म आराखडा येत्या महिन्याभरात सादर करावा. त्यानंतर महिन्याभरात पर्यटन विभागाकडून हा आराखडा अंतिम होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील. या परिसरात असणारी प्राचीन, पर्यटन, धार्मिक, ऐतिहासिक, वन पर्यटन स्थळे, निवासासाठी योग्य ठिकाणे, पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधा अशा सर्व बाबींचा समावेश असणारा सर्वसमावेशक सूक्ष्म आराखडा तयार करावा अशा सूचना जिल्हाधिकारी श्री . येडगे यांनी दिल्या.
यानंतर बालिंगा ते दाजीपूर मार्गावरील रस्त्याच्या कामाबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीत आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, बालिंगा ते दाजीपूर या मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी या रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण होणे आवश्यक आहे, असे आवाहन आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.
बालिंगा ते दाजीपूर मार्गावरील रस्त्याचे काम गतीने होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळाने परस्पर समन्वय ठेवावा. या मार्गातील जागेबाबत नागरिकांच्या असणाऱ्या शंकांचे निरसन होण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करा, असे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.