राज्यात खळबळ! धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात 'एस.पी. गँग'वर कोल्हापुरात पहिलीच MCOCA कारवाई; बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी व गर्भपाताचा गोरखधंदा चालवणाऱ्या ११ जणांच्या मुसक्या आवळल्या
schedule25 Aug 26 person by visibility 177 categoryगुन्हे
कोल्हापूर : सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळत आणि कायद्याला न जुमानता बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी व गर्भपाताचा विळखा घालणाऱ्या कुख्यात 'एस.पी. गँग'वर कोल्हापूर पोलिसांनी अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. राज्यातील अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधील ही पहिलीच 'मोक्का' (MCOCA) कायद्यांतर्गत कारवाई ठरली असून, या धडक कारवाईमुळे संपूर्ण राज्यभर मोठी खळबळ उडाली आहे.
करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भोगावती साखर कारखाना परिसर, शाहूनगर परिते येथील ब्लॉक नं. ५, रूम नं. ४ मध्ये पोलिसांनी सापळा रचून हा गंभीर प्रकार उघडकीस आणला. वैद्यकीय तालुका आरोग्य अधिकारी यांच्या फिर्यादीवरून दि. १ जुलै २०२६ रोजी करवीर पोलीस ठाण्यात BNS, महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम तसेच गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व निदान तंत्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
◼️अशी होती कुख्यात टोळीची कार्यपद्धती
तपासादरम्यान समोर आले की, या गुन्ह्यातील आरोपींकडे कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा कायदेशीर शिक्षण नसतानाही ते हा गोरखधंदा चालवत होते. ही टोळी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने काम करत असे. प्रामुख्याने गर्भवती महिलांना हेरून त्यांना आकर्षित करणे, गर्भलिंग तपासणीसाठी ग्राहक शोधणे, यासाठी बेकायदेशीररीत्या सोनोग्राफी मशीन खरेदी करणे, तपासणीसाठी जागा बदलणे आणि बऱ्याचदा थेट पेशंटच्या घरी जाऊन तपासणी करणे असा त्यांचा शिरस्ता होता. गर्भलिंग तपासणीनंतर गर्भ स्त्री-भ्रूण असल्याचे निष्पन्न झाल्यास, बेकायदेशीरपणे गर्भपाताची व्यवस्था केली जात असे.
◼️मागील १० वर्षांत ११ गंभीर गुन्हे दाखल
या टोळीची मागील १० वर्षांतील कुंडली तपासली असता, सन २०२० ते २०२६ या कालावधीत करवीर पोलीस ठाण्यात ०७, जुना राजवाडा पोलीस ठाण्यात ०१, राधानगरी पोलीस ठाण्यात ०२ आणि भुदरगड पोलीस ठाण्यात ०१ असे एकूण ११ गंभीर गुन्हे बोगस डॉक्टर, बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी व गर्भपाताचे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे या टोळीवर कठोर अंकुश ठेवणे गरजेचे बनले होते.
◼️पोलिसांचा दणका आणि मोक्का मंजुरी
सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना कठोर कारवाईचे आदेश दिले होते. अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलिसांनी या टोळीविरुद्ध 'मोक्का' कायद्यांतर्गत प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केला.
पोलिसांच्या प्रस्तावाची कसून छाननी केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी तो पुढील मंजुरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे पाठवला. त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी टोळीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि कायदेशीर निकषांची पूर्तता तपासून या कुख्यात टोळीविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कठोर कारवाईचे आदेश अधिकृतपणे निर्गमित केले.
◼️मोक्का कारवाईच्या जाळ्यात अडकलेले ११ आरोपी
या धडक कारवाईत पोलिसांनी टोळीप्रमुखसह एकूण ११ जणांना बेड्या ठोकल्या आहेत:
* स्वप्निल केरबा पाटील (वय ३५, रा. जयभवानी तरुण मंडळाजवळ, बालिंगा, ता. करवीर, जि. कोल्हापूर) - (टोळीप्रमुख)
* महेश सुबराव पाटील (वय ३५, रा. सिरसे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर)
* श्रीमंत तानाजी पाटील (वय ३७, रा. परिते, ता. करवीर, जि. कोल्हापूर)
* विजय लक्ष्मण कोळसकर (वय ३९, रा. मडीलगे खुर्द, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर)
* प्रशांत वसंत जाधव (रा. सीबीबी ४२५, वैभवनगर, जि. बेळगाव, कर्नाटक)
* दत्तात्रय कृष्णात पाटील (रा. सिरसे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर)
* ओंकार गोरखनाथ कराळे (वय ३०, रा. सडोली खालसा, ता. करवीर, जि. कोल्हापूर)
* सुनिल प्रकाश पाटील (वय ३८, रा. सिरसे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर)
* अनिल प्रकाश टिपुगडे (वय ४०, रा. भोगावती साखर कारखाना कॉलनी, भोगावती, ता. करवीर, मूळ रा. शिरगाव, कोल्हापूर)
* शिवप्रसाद सत्याप्पा महादेव पाटील (वय ४०, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर)
* अश्विनी गजानन शिंदे (वय ३८, रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर)
ही अत्यंत महत्त्वपूर्ण कारवाई कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, साहाय्यक फौजदार राहुल देसाई, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश कांबळे व स्थानिक गुन्हे शाखेचे साहाय्यक फौजदार सचिन पाटील यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.