कोल्हापूर महानगरपालिका : शासकीय कार्यालयाकडील 14 लाख रुपये पाणीपट्टी थकबाकी वसूल
schedule15 Mar 24 person by visibility 989 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने शासकीय कार्यालयाकडील थकबाकी वसूलीची मोहिम तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत दोन शासकीय विभागाकडील थकीत रु.14 लाख पाणी पुरवठा विभागाकडून वसूल करण्यात आले आहे. यामध्ये समाज कल्याण विभागाकडील थकीत रक्कम रु.1 लाख 93 हजार व टेलिफोन विभागाकडील थकीत रक्कम रु.12 लाख 44 हजार 604 वसुल करण्यात आले आहे.
पाणीपट्टी विभागास सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता रु.77 कोटी इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे. आजअखेर रु.42 कोटी 85 लाख 86 हजार रक्कम वसुल करण्यात आले आहे. सदरचे अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी वसूलीचे उद्दीष्ठ पुर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मोठ्या थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने रेल्वे विभागाकडील थकीत रक्कम वसुलीसाठी 3 इंची नळ कनेक्शन खंडीत करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्यावतीने पाणीपट्टी विलंब आकारामध्ये सवलत योजना जाहीर करण्यात आलेली आहे. या अंतर्गत पाणी बिलाची थकीत रक्कम एकरक्कमी भरल्यास विलंब आकारामध्ये 50 टक्के व 30 टक्के सवलत देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजअखेर 15 हजार 599 कनेक्शन धारकांना सदर योजनेचा लाभ घेतला आहे. या सवलत अंतर्गत सुमारे रु. 34 लाख 27 हजार 582 इतका विलंब आकारामध्ये नागरीकांना सवलत मिळाली आहे. उर्वरित रु.38 लाख 89 हजार 306 इतका विलंब आकार आणि रु.4 कोटी 92 लाख 99 हजार 891 इतकी थकीत पाणी बिलाची रक्कम मिळून 5 कोटी 31 लाख 89 हजार 197 इतकी रक्कम वसुल करण्यात आली आहे. 31 मार्च 2024 अखेर थकीत रक्कम एकरक्कमी भरल्यास विलंब आकारामध्ये 30 टक्के सवलत देण्यात येणार असून जास्तीत-जास्त नागरीकांनी या सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.