महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवरील सुविधांची कोकण विभागीय आयुक्तांकडून पाहणी
schedule03 Dec 24 person by visibility 121 categoryराज्य
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर येऊन अभिवादन करतात. त्यांच्यासाठी प्रशासनामार्फत विविध सोयीसुविधा चैत्यभूमी आणि परिसरात केल्या जातात. कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी या सुविधांची पाहणी करून आढावा घेतला.
विभागीय आयुक्त देशमुख म्हणाले की, चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येत असून अनुयायांसाठी वैद्यकीय कक्षही उभारण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) आणि परिसरात पुरविण्यात येणाऱ्या नागरी सेवा-सुविधांबाबत सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करीत समन्वय साधून कार्यवाही करावी. तसेच उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा अनुयायांना मिळतात की नाही याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी कोकण विभागीय अतिरिक्त आयुक्त विवेक गायकवाड, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी, सहायक पोलीस आयुक्त प्रवीण तेजाळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सर्व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच चैत्यभूमी येथे दाखल झालेल्या अनुयायांना खाद्य पदार्थांच्या किटचे वाटप करण्यात आले.