केंद्रीय कर्मचार्यांच्या मुलांसाठी कोल्हापुरात लवकरच केंद्रीय विद्यालय सुरू होणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती
schedule09 May 25 person by visibility 250 categoryराज्य

▪️भविष्यातील हवाई सेवेचा वाढता विस्तार लक्षात घेता उजळाईवाडी विमानतळाची धावपट्टी ३ हजार मीटरपर्यंत वाढवणार, एरो ब्रिजची सुविधाही उपलब्ध होणार, खासदार धनंजय महाडिक
कोल्हापूर : केंद्रीय कर्मचार्यांच्या मुलांसाठी आवश्यक असणार्या केंद्रीय विद्यालयाचा प्रश्न येत्या वर्षभरात मार्गी लागेल, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन जागा सुचवल्या असून, केंद्रीय समितीच्या पाहणी आणि मान्यतेनंतर केंद्रीय विद्यालयाचे काम लवकरच मार्गी लागेल, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह खाते प्रमुखांच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भविष्यातील हवाई सेवेचा वाढता व्याप लक्षात घेऊन उजळाईवाडी विमानतळाची धावपट्टी ३ हजार मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. तसेच टर्मिनल बिल्डिंगमध्ये एरो ब्रिजची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, असेही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले.
खासदार धनंजय महाडिक यांनी आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह विविध विभागांच्या अधिकार्यांची आढावा बैठक घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसाच्या कृती कार्यक्रमांमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात दुसर्या क्रमांकावर आल्याबद्दल खासदार महाडिक यांनी जिल्हाधिकारी येडगे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यानंतर झालेल्या आढावा बैठकीत कोल्हापुरातील केंद्रीय विद्यालय, कोल्हापुरी चप्पल क्लस्टर योजना, विमानतळ विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण, वन विभागाच्या जमिनीतून जाणारे रस्ते या प्रमुख विषयांवर सुमारे एक तास सविस्तर चर्चा झाली. बैठकीनंतर बोलताना खासदार महाडिक यांनी याबाबत माहिती दिली.
कोल्हापुरात केंद्र सरकारच्या कर्मचार्यांच्या मुलांसाठी केंद्रीय विद्यालय व्हावे म्हणून आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. सध्या केवळ पुणे आणि बेळगाव येथेच केंद्रीय विद्यालय आहे. त्या पाठोपाठ कोल्हापुरातही केंद्रीय विद्यालय होण्यासाठी आपण केलेल्या प्रयत्नांना यश आले असून, शासनानं त्याला मान्यता दिली आहे. त्या दृष्टीने कोल्हापुरात दोन ठिकाणच्या जागा प्रशासनाने सुचवल्या आहेत. केंद्रीय समितीने जागेची पाहणी करून त्याला मान्यता दिल्यानंतर हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले.
कोल्हापुरातील उजळाईवाडी विमानतळावरून १५ मे पासून हवाई सेवेचा विस्तार होत आहे. लवकरच हैदराबाद आणि बेंगलोर या दोन नवीन मार्गावर विमानसेवा सुरू होत आहे. चालू वर्ष अखेरीपर्यंत आणखी काही प्रमुख शहरे कोल्हापुरातून हवाई सेवेने जोडली जातील. त्यामुळे भविष्यातील हवाई सेवेची वाढती व्याप्ती लक्षात घेता विमानतळाचे विस्तारिकरण करण्यात येत आहे. सध्या विमानतळाची असणारी धावपट्टी २ हजार ३०० मीटर वरून ३ हजार मीटर पर्यंत वाढवण्यात येईल. तसेच एरो ब्रिजची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे, असेही खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
कोल्हापुरी चप्पलही कोल्हापूरची खासियत आहे. या चपलेला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी क्लस्टर योजनाही अंमलात येत आहे. केंद्र सरकारने चर्मउद्योगाच्या वाढीसाठी १०० कोटी रुपयांची मेगा क्लस्टर योजना जाहीर केलीय. याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरी चप्पलच्या क्लस्टर योजनेला गती देण्याचे आपले प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. जिल्ह्याच्या दुर्गम डोंगरी तालुक्यातून वन विभागाच्या हद्दीतून ६ रस्ते गेले आहेत. हे रस्ते नागरिकांच्या वापरात येण्यासाठी पीडब्ल्यूडी, वन विभाग, आणि जिल्हा प्रशासन यांच्यासोबत बैठक घेवून हा प्रश्न मार्गी लावू, असे खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केले. यावेळी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे, जिल्हा परिषदेच्या प्रकल्प अधिकारी सुषमा देसाई, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.