शक्तीपीठ महामार्ग विरोधी लढा : बांधा ते वर्धा मे अखेरीस संघर्ष यात्रा काढणार : आमदार सतेज पाटील
schedule09 May 25 person by visibility 295 categoryराज्य

कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गा विरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी बांधा ते वर्धा मे अखेरीस संघर्ष यात्रा काढणार असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला.
नागपूर -गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असून या राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी गुरुवारी सायंकाळी राज्यभरातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. 12 जिल्ह्यातील बाधीत शेतकरी या बैठकीत सहभागी झाले होते.
आमदार सतेज पाटील म्हणाले शक्तीपीठ महामार्ग विरोधात ग्रामसभेमध्ये ठराव प्राधान्याने घेतले पाहिजेत. तसेच हा फक्त बाधित शेतकऱ्यांचा लढा नसून आंदोलनाला व्यापक बनवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व घटकांना यामध्ये समावेश केला पाहिजे. त्याविषयी नियोजन करण्यात येईल. ज्या मार्गातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. त्या भागाच्या विकासाच्या दृष्टीने सर्व साधने उपलब्ध आहेत. चांगल्या प्रकारे औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात शेती येथे होत आहे. यामुळे आमची विरोधक म्हणून विरोधाची भूमिका नसून गरज नसताना शक्तीपीठ माथी मारण्याचे काम या शासनाचे आहे. शक्तीपीठ रस्त्यासाठी 86 कोटींचे कर्ज घेणार आहेत. पण या शक्तीपीठांचा विकास करायचा असेल तर प्रत्येक शक्तीपीठाला एक हजार कोटी द्या तिथे येणाऱ्या भाविकांना सुविधा देता येईल.
आमदार सतेज पाटील म्हणाले हा विषय फक्त शक्तीपीठ जोडण्याचा नसून भ्रष्टाचाराचे एक नवीन कुरण सरकारला खुले करायचे आहे. तसेच बैठकीमध्ये सुचवल्याप्रमाणे संरक्षणासाठी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा विषय महत्त्वपूर्ण असून शेतकऱ्यांनी परवानगी न घेताच भूमापनासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पासून संरक्षण व्हावे यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देणे ही सूचना खूपच चांगली आहे.
गडचिरोलीच्या खाणीमधून येणार साहित्य थेट बंदरापर्यंत पोहोचवण्याचा हा मार्ग आहे अशी चर्चा गडचिरोली परिसरात होत आहे. तसेच सर्व लोकप्रतिनिधींना पुन्हा भेटून त्यांच्याकडून निवेदन घेणे त्यांची भूमिका जाणून घेणे महत्त्वाचे आहे. लोकप्रतिनिधींची भूमिका समजली पाहिजे. गरज नसलेला शक्तीपीठ हा मार्ग आमच्या माथी मारू नका. या भूमिकेवर आपण सर्व ठाम राहूया आमची ताकद आपल्या सर्वांबरोबर असेल असे सतेज पाटील यांनी सांगून येत्या मे अखेरीस बांधा ते वर्धा अशी संघर्ष यात्रा काढणार असल्याचे सांगितले.
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले. हा फक्त शक्तिपीठ महामार्ग फक्त बाधित शेतकऱ्यांचा लढा नसून यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होणार आहे. तसेच या महामार्गामुळे नद्यांच्या बाजूला जो भराव टाकला जाणार आहे त्या भरावामुळे मोठ्या प्रमाणात पुरबाधित क्षेत्र निर्माण होणार आहे. त्यामुळे लोकांना त्याचा फटका बसणार आहे. सांगली, कोल्हापूर आणि कराड भागांना याचा फटका बसणार आहे. तसेच सह्याद्रीचा डोंगर फोडून मार्ग करण्यात येणार आहेत. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे हा फक्त शेतकरी बाधितांचा विरोध नसून सर्वसामान्य जनतेचा विरोध आहे. दाखवून देण्याची गरज आहे. तसेच ज्या मार्गातून शक्तीपीठ जातो त्या प्रत्येक तालुक्यात मेळावा घेऊन आंदोलनाला बळकटी देता येईल.
उद्धवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले सिंधुदुर्ग तालुक्यातून आलेली सूचना भावनेला हात घालणारी आहे . छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडाच्या संदर्भातील हे सरकार विचार करत नाही. पदोपदी छत्रपती शिवरायांचे नाव घ्यायचे आणि भाम्रक विकासाच्या नावावर काही करायचं.
या ऑनलाईन बैठकीमध्ये तालुका प्रतिनिधींनी तालुक्यातील शक्तिपीठ महामार्ग बाबत केलेल्या आंदोलनाची माहिती दिली. या बैठकीमध्ये आमदार, माजी आमदार, बाधित शेतकरी ऑनलाईन सहभागी झाले होते..