कोल्हापूर पंचगंगा स्मशानभूमीतील कामाची प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी
schedule21 Nov 25 person by visibility 39 categoryमहानगरपालिका
▪️घाटावरील आकांक्षी शौचालयाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्याच्या सूचना
कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमी परिसरात सुरू असलेल्या कामांची तसेच शेणी व लाकडाच्या साठ्याची तपासणी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी आज दुपारी केली. स्मशानभूमीतील शेणी व लाकडांबाबत प्राप्त तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली.
पाहणीदरम्यान त्यांनी दान स्वरूपात आलेली शेणी, ठेकेदारामार्फत महापालिकेकडे जमा होणारी शेणी आणि उद्यान विभागातून स्मशानभूमीत दाखल होणाऱ्या लाकडाच्या साठ्याची नोंदणी रजिस्टर तपासून पाहिली. मागील सहा महिन्यांचे सर्व रेकॉर्ड तपासण्याच्या सूचना सहायक आयुक्तांना देण्यात आल्या. त्यानंतर स्मशानभूमीच्या विस्तारीकरणाच्या कामाचीही पाहणी करून गतीने काम करण्याचे निर्देश दिले. स्मशानभूमीतील लाकुड व शेणीसाठी असलेले शेड कमकुवत झालेने ते तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश शहर अभियंता यांना दिले. त्याचबरोबर या ठिकाणी असलेली टॉयलेटही दुरुस्त करण्याबाबत एस्टीमेट सादर करण्याचे आदेश दिले.
यानंतर पंचगंगा घाटावर नव्याने बांधल्या जात असलेल्या आकांक्षी शौचालयाची (अस्परेशन टॉयलेट) पाहणी करून हे काम डिसेंबर अखेर पूर्ण करावे, अशा सूचना संबंधित कनिष्ठ अभियंत्यांना देण्यात आल्या. तसेच घाट परिसरातील बोटॅनिकल गार्डनमधील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून देण्याचे निर्देश शहर अभियंत्यांना दिले.
या पाहणी वेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, सहायक आयुक्त कृष्णा पाटील, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे आणि आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे उपस्थित होते.