नव्या भारताबरोबरच सांस्कृतिक परंपरेचा उलगडला इतिहास…; चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
schedule18 Sep 25 person by visibility 57 categoryराज्य

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील नवा भारत व सामर्थ्यवान समृद्ध भारतीय सांस्कृतिक परंपरा उलगडणाऱ्या अनोख्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, अकादमीच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष दीपक करंजीकर, सदस्य मोहन बने आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून नव्या भारताच्या वाटचालीबरोबरच देशातील पुरातन सांस्कृतिक वैशिष्टे व परंपरांची नव्या पिढीला माहिती होईल, असा विश्वास मंत्री ॲड. शेलार यांनी व्यक्त केला.
राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ‘नवा भारत : सांस्कृतिक महासत्ता’ या उपक्रमाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत २३ सप्टेंबरपर्यंत प्रदर्शन भरविण्यात येणार होते. मात्र, उद्घाटनानंतर वैविध्यपूर्ण व लक्षवेधी प्रदर्शन पाहिल्यानंतर प्रदर्शनाला आणखी दोन दिवसांची मुदतवाढ देण्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी केली. आता २५ सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत प्रदर्शन रसिकांसाठी खुले राहणार आहे.
जगभरात सांस्कृतिक महासत्ता म्हणून भारताची ओळख आहे. देशातील योग, ध्यान, अध्यात्म, आयुर्वेद, स्थापत्य, संगीत, हस्तकला, लोककला, वस्त्र आणि सांस्कृतिक परंपरांबद्दल जगभरातील नागरिकांमध्ये कायम उत्सुकता पहावयास मिळते. तर गेल्या ११ वर्षांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सांस्कृतिक परंपरेबरोबरच अन्य क्षेत्रातील अस्तित्वाची जगाला जाणीव करून दिली. देशाला सुवर्णकाळाकडे नेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पायाभूत सुविधा उभारण्याबरोबरच नियोजनबद्ध पद्धतीने विविध निर्णय घेतले आहे. जागतिक स्तरावरील एक जबाबदार देश म्हणून भारताची समर्थ वाटचाल सुरू झाली आहे. त्याचा वेध या छायाचित्र प्रदर्शनातून घेण्यात आला आहे. त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचे पुरातन वैभव, संस्कृती व वारसा, विविधतेतून एकता आणि परिवर्तन असे विविध विषय या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत.