डॉ.बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये ग्रंथ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
schedule07 Jan 25 person by visibility 310 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" उपक्रमांतर्गत वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक आणि वाचनप्रेमींनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. इन्स्टिट्यूट चे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
यावेळी गौरव गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी, प्रा. सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या डॉ. कल्पना कांबळे, डॉ. विशाल पोवार आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना गौरव गावडे यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करत, “विद्यार्थ्यांनी पुस्तकाद्वारे ज्ञान, विज्ञान, आणि तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतःला सुसंस्कृत आणि समृद्ध बनवावे,” असे प्रतिपादन केले. या ग्रंथ प्रदर्शनात शैक्षणिक, साहित्यिक, आणि तांत्रिक क्षेत्रातील विविध विषयांवरील ग्रंथांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रदर्शनाने वाचनप्रेमींचे लक्ष वेधून घेतले असून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने ग्रंथ वाचनासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात प्रा. सुदर्शन महाडिक, प्रा. अशोक कोळेकर, आणि ग्रंथपाल महेश देसाई यांचे मोलाचे योगदान लाभले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्रा. शुभांगी गावडे, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.