गोकुळच्या देशी लोण्याची परदेशातील ग्राहकांना भुरळ...; गोकुळच्या गुणवत्तेमुळे अझरबैजान देशाची ४२० मे.टन देशी लोण्याची नवीन मागणी : चेअरमन अरुण डोंगळे
schedule25 Nov 24 person by visibility 213 categoryउद्योग
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सह. दूध उत्पादक संघ (गोकुळ) ने अझरबैजान या देशातील अटेना दूध संघास दि.२२ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा नवीन २१० मे. टन देशी लोणी (बटर) गोकुळ प्रकल्प येथून संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत वातानुकूलित कंटेनर मधून रवाना करण्यात आले.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, उच्च गुणवत्तेच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या मागणीमुळे भारतातून दुग्धजन्य पदार्थाची निर्यात सातत्याने वाढत आहे. याचाच एक भाग म्हणून गोकुळने पश्चिम आशियातील व पूर्व युरोपातील अझरबैजान देशातील बाकू या प्रदेशातील अटेना दूध संघास या पूर्वी ४२ मे.टन गायीचे देशी लोणी निर्यात केले होते. या निर्यात केलेल्या देशी लोण्याची गुणवत्ता व चव अझरबैजान व शेजारील देशातील ग्राहकांना आवडल्याने गोकुळच्या देशी लोण्याला मागणी वाढू लागल्याने अटेना डेअरीने गोकुळ कडून पुन्हा एकदा नवीन ४२० मे.टनाची मागणी केली असून यापैकी २१० मे.टन देशी लोणी रवाना केले. या निर्यातीमुळे अतिरिक्त गाय दुधापासून उत्पादित होणारे गायीचे देशी लोणी व दूध भुकटी याची निर्गत होण्यास मदत होणार असल्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले.
गोकुळच्या देशी लोण्याला तेथील देशात मागणी वाढली असून गोकुळची उत्पादने व त्यांच्या गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त करून भविष्यात गोकुळची इतर दुग्धजन्य उत्पादने आयात करण्यास इच्छुक असल्याचे अटेना डेअरी यांच्यावतीने कळविले आहे. याचबरोबर कतार, ब्राझील, आफ्रिका, बांगलादेश या देशातून गोकुळच्या दूध भुकटी व देशी लोणीसाठी मागणी येत आहे.
याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रटरी प्रदीप पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, मार्केटींग व्यवस्थापक हणमंत पाटील, उपेंद्र चव्हाण, लक्ष्मण धनवडे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.