+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustबापट कॅम्पमधील मूर्तिकारांना मार्केट यार्डात निवारा शेड उपलब्ध करा : सतेज पाटील यांच्या सूचना; पूरग्रस्त भागाची केली पाहणी adjustकाँग्रेसच्या समन्वय समितीत आमदार सतेज पाटील adjustबनावट पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे व देणारे दोघांवरही कायदेशीर कारवाई व्हावी - राज्यपाल रमेश बैस adjustराज्यपालांच्या उपस्थितीत कारगिल विजय दिवस रजत जयंती समारोह साजरा adjust'‘बेस्ट’च्या बळकटीकरणासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस adjustघाबरुन न जाता वेळेत स्थलांतरीत होवून प्रशासनाला सहकार्य करा; शासन आपल्या पाठीशी; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला पूरग्रस्तांना धीर adjustकोल्हापुरातील पंचगंगा तालीम, सुतारवाडा, सीता कॉलनी, शाहूपुरी, बापट कॅम्प परिसराती 228 नागरीकांचे स्थलांतर adjustकारगिल ऑपरेशन विजय भारतीय जवानांच्या शौर्याचे प्रतीक : कॅप्टन डॉ. अमित रेडेकर; के.एम.सी. कॉलेज व गोखले कॉलेज यांच्या वतीने कारगिल विजय दिन साजरा adjustडीकेटीईच्या १४ टेक्स्टाईल विद्यार्थ्यांची रिड अँण्ड टेलर कंपनीमध्ये निवड adjustबगॅसपासून वीज निर्मिती करणार्‍या साखर कारखान्यांना राज्य आणि केंद्र शासनाकडून अनुदान मिळावे, खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी
1000867055
1000866789
schedule20 May 22 person by visibility 1110 categoryसंपादकीय
कोल्हापूर... राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जिल्हा. शाहू विचारांची कास धरुन विकासाची वाटचाल करणाऱ्या या पुरोगामी जिल्ह्यातील हेरवाड गावाने 5 मे 2022 रोजी ‘विधवा प्रथा बंदी’ चा ठराव करून फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा वसा आपल्या कृतीतून जपला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील सुमारे नऊ ते दहा हजार लोकवस्तीच्या हेरवाड गावाने आज राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गावात विधवा प्रथा बंद करण्याचा सर्वानुमते ठराव करून त्यास ग्रामसभेची मंजुरी घेतली. गावचे सरपंच सुरगोंडा पाटील आणि ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर यांच्या विशेष प्रयत्नातून या ठरावाला पाठबळ मिळाले.

अनेक सामाजिक प्रथा आणि परंपरेने विधवा महिलांच्या जगण्या-वागण्यावर मर्यादा येतात. अनेक वाईट प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागते. समाजात वावरताना विधवा म्हणून असणारे दडपण, यातून त्यांची होणारी अवहेलना, मानसिक, सामाजिक कुचंबना अशा साऱ्या दिव्यातून जात असताना त्यांच्या जगण्याची परवड होते. समाजात विधवा महिलांना मिळणारे दुय्यम स्थान, शुभ कार्यातील मान सन्मानापासून वंचित राहत, अनेक गोष्टींचा सामना त्यांना करावा लागतो. मात्र आता हेरवाड गावाने घेतलेल्या या ‘विधवा प्रथा बंद’ ठरावामुळे गावात महिलांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळण्याबरोबरच समाजात सन्मानाची वागणूकही मिळणार आहे.

🔻हेरवाड गावाने 5 मे 2022 रोजीच्या ग्रामसभेत घेतलेला निर्णय......
‘आपल्या समाजात पतीच्या निधनावेळी, अंत्यविधीवेळी पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे तसेच महिलांना विधवा म्हणून कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे. या प्रथेमुळे या अधिकारावर गदा येत आहे म्हणजेच कायद्याचा भंग होत आहे, तरी आपल्या गावामध्ये व देशामध्ये विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे याकरिता ‘विधवा प्रथा बंद’ करण्यात येत आहे. यासंदर्भात गावामध्ये जनजागृती करण्यात यावी त्यास ही सभा मंजुरी देत आहे’, असा ठराव ग्रामसभेने सर्वानुमते मंजूर केला.

या ठरावाच्या सुचक मुक्ताबाई संजय पुजारी असून ठरावास सुजाता केशव गुरव यांनी अनुमोदन दिले आहे.

 हेरवाड गावाने गावात विधवा प्रथा बंद करून महिलांना सन्मान देऊन राज्यासह देशात एक आदर्श निर्माण केला आहे. हेरवाड गावच्या निर्णयाचे राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी अनुकरण करावे असाच हा निर्णय आहे.

🔻हेरवाडच्या निर्णयाची राज्य शासनानेही घेतली दखल
समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट व्हाव्यात यासाठी हेरवाड गावाने घेतलेल्या ‘विधवा प्रथा बंद’ या निर्णयाची दखल राज्य शासनाने त्वरित घेतली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व मंत्री महोदयांनी या निर्णयाचे स्वागत करुन गावकऱ्यांना धन्यवाद दिले. ग्रामविकास विभागाने तर 17 मे 2022 रोजी समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन व्हावे यासाठी शासन परिपत्रक काढले. राज्यातील सर्व ग्रामपंचायतीने हेरवाड गावचा आदर्श घेऊन आपल्या गावातही असा निर्णय घ्यावा आणि याबाबतची जनजागृती करावी याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचित केले आहे.

🔻हेरवाड गावचे अनुकरण करा
हेरवाडच्या क्रांतीकारक निर्णयाची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दखल घेवून ग्रामविकास विभागाच्या वतीने याबाबत परिपत्रक काढले. विधवा महिलांना इतर महिलांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. स्त्रियांच्या अधिकाराचे हनन होऊ नये यासाठी हेरवाड गावचे अनुकरण करावे व त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराने महाराष्ट्र राज्याची वाटचाल सुरु असून राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घ्यावा. यावर्षी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता पर्व सुरु आहे. गावात विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेऊन राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वसा पुढे नेऊया, हीच छत्रपती शाहू महाराजांना खरी आदरांजली ठरेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे.

🔻हेरवाड गावचा सार्थ अभिमान
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षात हेरवाड गावाने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेऊन शाहू राजांच्या विचारांचा वसा जपला आहे. जिल्ह्यातील हेरवाड गावाने हा निर्णय घेऊन शाहू महाराजांना एक अनोखे अभिवादन केले आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री व एक कोल्हापूरकर म्हणून हेरवाड ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाचा सार्थ अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली.

🔻हेरवाडचा निर्णय स्वागतार्ह
विधवा प्रथा बंद करून महिलांना सन्मानाची वागणूक देण्याचा हेरवाड गावाने घेतलेला निर्णय क्रांतिकारी व स्वागतार्ह आहे. या निर्णयाचे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी अनुकरण करावे. शासनानेही या निर्णयाची जनजागृती व अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक काढले आहे. कोल्हापूर हा शाहू राजांच्या विचारांवर पुढे जाणारा जिल्हा असून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती हेरवाडच्या निर्णयाचे अनुकरण करतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केला आहे.

‘विधवा प्रथा बंद’ हा हेरवाड गावाने घेतलेला निर्णय क्रांतिकारी असाच म्हणावा लागेल. या निर्णयामुळे विधवा महिलांना सन्मान मिळून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल. गावाने घेतलेल्या या निर्णयाची नोंद सुवर्ण अक्षराने घेण्यासारखी असून या निर्णयाचे प्रत्येक गावाने स्वागत करुन हा निर्णय आपल्या गावातही घ्यावा, हीच अपेक्षा...

🟣 :- एकनाथ पोवार ,माहिती सहायक विभागीय माहिती कार्यालय, 
कोल्हापूर