राज्यस्तरीय मुलींच्या खो खो स्पर्धेत मेन राजाराम अजिंक्य सुवर्णपदक पटकावले
schedule17 Nov 25 person by visibility 134 categoryक्रीडा
कोल्हापूर:- समृद्ध शिक्षणाची वैभवशाली परंपरा असणाऱ्या करवीर नगरीतील जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेजने शालेय राज्यस्तरीय १९ वर्षाखालील मुलींच्या खो-खो स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात विजय प्राप्त करून सुवर्णपदक पटकावले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद नाशिक व जिल्हा क्रीडा कार्यालय, नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने १९ वर्षाखालील मुलींच्या शालेय राज्यस्तरीय
खो खो स्पर्धा दिनांक १५ ते १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल हिरावडी पंचवटी नाशिक येथे संपन्न झालेल्या या राज्यस्तरीय
मेन राजाराम प्रशालेच्या संघाने साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून अंतिम सामन्यामध्ये दणदणीत विजय प्राप्त करून अजिंक्यपद मिळविले.
शालेय खो-खो क्रीडा स्पर्धेत दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी पहिल्या सामन्यात अमरावती संघाचा पराभव करत पहिला विजय प्राप्त केला.दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुसऱ्या फेरीत छञपती संभाजी नगर संघावर दणदणीत विजय मिळवत तिसऱ्या फेरीत अटीतटीच्या लढतीत नाशिक संघावर मात करून देदीप्यमान यश प्राप्त करून उपांत्य फेरीत प्रवेश प्राप्त केला. याचदिवशी दुपारी संपन्न झालेल्या उपांत्य फेरीत मेन राजाराम प्रशालेच्या संघाने लातूर संघावर दणदणीत विजय प्राप्त करीत यशस्वी घौडदौड राखत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. कर्णधार अमृता पाटील हिच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर संघाने दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी नाशिक संघावर १० गुणांनी मात करून देदीप्यमान यश प्राप्त करून सुवर्णपदक पटकावले आहे. कर्णधार अमृता पाटील सर्वोत्कृष्ट खेळाडू तर सानिका चाफे हिला उत्तम संरक्षक किताब मिळाला आहे.
या विजयी संघामध्ये अनुष्का पाटील, सलोनी जामदार, सानिका चाफे, संगीता फाले, श्रावणी लक्ष्मण पाटील, श्रावणी दीपक पाटील, वैष्णवी पाटील, दीक्षा पाटील, आशाराणी पोवार, अर्चना माने, अमृता पाटील, सिद्धी माने यांचा समावेश आहे. संघाला प्रशिक्षक बी. आर. भांदिगिरे, क्रीडा शिक्षक प्रा. बी. पी. माळवे, उपप्राचार्या श्रीमती व्ही. ए. खडके यांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले. तर प्राचार्य डॉ. जी. व्ही. खाडे, प्रा.संजय कुंभार यांचे सहित प्रशालेतील सर्व शिक्षकांचे प्रोत्साहन मिळाले. खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे विशेष अनमोल सहकार्य मिळाले. तसेच कोल्हापूर मनपा क्रीडा कार्यकारी अधिकारी श्री. सचिन पांडव,श्रीमती ऐश्वर्या सावंत, प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार यांचे अनमोल सहकार्य संघास मिळाले. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कार्तिकेयन एस., प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी खेळाडूंचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले. प्राचार्य डॉ . जी. व्ही. खाडे, उपप्राचार्या श्रीमती व्ही. ए. खडके, प्रा.संजय कुंभार, विकास फडतारे,यांच्या सहित सर्व काॅलेजचे अधिकारी व पदाधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी, नागरिक यांनी या यशाबद्दल संघाचे अभिनंदन केले. राज्यस्तरावर मेन राजाराम प्रशालेचे क्रीडा क्षेत्रातील नेतृत्व सिद्ध झाल्याबद्दल प्रशालेचापरिसर गुलाला मध्ये न्हाऊन निघाला. विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला फटाक्याची आतिषबाजी करून आपला आनंद द्विगुणीत केलेला आहे. परिसरामध्ये पेढे वाटून हा आनंद प्रशालेने साजरा केला.