भाऊ पाध्ये काळाच्या चौकटी तोडणारा लेखक : श्रीराम पवार
schedule13 Dec 25 person by visibility 53 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : पाध्ये काळाच्या चौकटी तोडणारा लेखक आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक श्रीराम पवार यांनी केले. ते शिवाज विद्यापीठातील मराठी विभाग आयोजित साठोत्तरी काळातील अग्रगण्ये लेखक भाऊ पाध्ये यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या ‘भाऊ पाध्ये यांचे वाङ्मय: आकलन आणि पुनर्विचार’ या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते. आपल्या मनोगतामध्ये ते पुढे म्हणाले की, या चर्चासत्राच्या निमित्ताने पाध्ये यांच्या लेखनाचे नव्याने पूनर्मूल्यांकन होते आहे. महानगरीय जीवनाचा विस्तृत आलेख पाध्ये यांच्या कथा-कादंबऱ्यांमधून आलेला आहे. तसेच पत्रकारीतेचे सूक्ष्म निरीक्षण पाध्येंच्या ललित लेखनातून निर्भयपणे आलेले दिसून येते.
समारोप प्रसंगी कवी, अनुवादक आणि समीक्षक प्रा. चंद्रकांत पाटील आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की, भारतीय परंपरेतील श्रेष्ठ साहित्यिक म्हणून पाध्येंचा गौरव केला पाहिजे. ते मुंबईचा भाष्यकार ठरतात. अशा श्रेष्ठ लेखकावर मध्य प्रवाहामध्ये समीक्षकांनी म्हणावे ते लक्ष दिले नाही.
दोन दिवस चाललेल्या या चर्चासत्रामध्ये एकूण चार सत्रांमधून भाऊ पाध्ये यांच्या साहित्याविषयी विविधांगी मांडणी करण्यात आली. या चर्चासत्राच्या पहिल्या सत्रामध्ये ‘भाऊ पाध्ये यांचे कथावाङ्मय’ यामध्ये आसाराम लोमटे यांनी ‘भाऊ पाध्ये यांची कथा आकलन आणि अन्वयार्थ’ तर अवधुत डोंगरे यांनी ‘भाऊ पाध्ये यांच्या कथेतील धक्कातंत्र’ या विषयावर मांडणी केली. या सत्राच्या अध्यक्ष म्हणून डॉ. माया पंडित-नारकर यांनी एकूणच भाऊ पाध्ये यांच्या कथेविषयी मांडणी केली. ‘भाऊ पाध्ये यांचे कादंबरी वाङ्मय’ या दुसऱ्या सत्रामध्ये शितल पावसकर यांनी ‘भाऊ पाध्ये यांच्या कादंबरीतील स्त्रीचित्रण’ आणि दत्ता घोलप यांनी ‘भाऊ पाध्ये यांची कादंबरी अविष्कार विशेष’ याविषयी मांडणी केली. चर्चासत्राच्या तिसऱ्या सत्रामध्ये ‘भाऊ पाध्ये यांचे निवडक वाङ्मय’ यावर ओंकार थोरात यांनी पाध्ये यांच्या कथेचे अभिवाचन केले. ‘भाऊ पाध्ये : स्तंभलेखन, चित्रपटविषयक आणि अन्य लेखन’ या चौथ्या सत्रामध्ये प्रसाद कुमठेकर यांनी ‘भाऊ पाध्ये यांचे चित्रपटविषयक लेखन’ याविषयावर मांडणी केली तसेच गोरख थोरात यांनी ‘राडा कादंबरीचे भाषांतर’ या अनुषंगाने मांडणी केली तर सचिन परब यांनी ‘पत्रकार भाऊ पाध्ये’ या अनुषंगाने मांडणी केली. या सत्राचे अध्यक्ष डॉ. श्रीराम पवार होते. त्यांनी एकूणच भाऊ पाध्ये यांच्या अन्य लेखनाविषयी आपल्या मनोगतामधून मांडणी केली. या कार्यक्रमाचे प्रास्तावित विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी केले. याप्रसंगी डॉ. नंदकुमार मोरे यांनी दोन दिवसाच्या चर्चासत्रातील महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजली क्षीरसागर तर आभार डॉ. सुखदेव एकल यांनी मांनले. या चर्चासत्रामध्ये शिवाजी विद्यापीठ संलग्नित विविध महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते तसेच मराठी विभागाचे संशोधक आणि एम. ए. चे विद्यार्थीही उपस्थित होते.