‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन
schedule30 Dec 24 person by visibility 171 categoryशैक्षणिक
▪️सर्वांसाठी १५ दिवस पाहण्यास खुले; पुस्तके मोफत वाचता येणार
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह नागरिकांनी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्रात आयोजित ग्रंथ प्रदर्शन, मोफत वाचन यांसह आयोजित विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्रामध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत आयोजित विविध प्रकारच्या ग्रंथांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज सकाळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते ज्ञानस्रोत केंद्राच्या प्रवेशद्वारी बांधलेली फीत कापून ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते. मान्यवरांनी प्रवेशद्वारी मांडलेल्या ग्रंथ प्रदर्शनासह संदर्भ ग्रंथ दालनामधील विशेष प्रदर्शनाचीही पाहणी केली. संचालक डॉ. धनंजय सुतार आणि डॉ. प्रकाश बिलावर यांनी प्रदर्शनात मांडलेल्या ग्रंथांची वैशिष्ट्यांची माहिती कुलगुरूंना दिली.
या प्रदर्शनात शिवाजी विद्यापीठातर्फे प्रकाशित निवडक २५ ग्रंथ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित १५ ग्रंथ, साहित्य अकादमीकडून प्रकाशित ९० ग्रंथ तसेच ३५ दुर्मिळ संदर्भ ग्रंथ मांडले आहेत. यामध्ये विश्वकोश, नकाशे आणि इतर संदर्भ ग्रंथांचा समावेश आहे. प्रदर्शनस्थळी निवडक वाचनीय शंभर पुस्तकांची यादी सुद्धा वाचकांच्या सोयीसाठी प्रदर्शित करण्यात आली आहे.
दुर्मिळ ग्रंथ विभागामध्ये एकूण १५३ दुर्मिळ ग्रंथ प्रदर्शनात मांडले आहेत. यामध्ये ग्रंथांखेरीज हस्तलिखिते, ताम्रपट तसेच कोल्हापूर परिसरात उत्खननांतर्गत मिळालेल्या वस्तू देखील ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर विद्यापीठ ग्रंथालयात दाखल झालेले रसायनशास्त्राचे पहिले पुस्तक देखील पाहता येणार आहे. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची स्वाक्षरी असलेली ‘अग्निपंख’ पुस्तकाची प्रतही प्रदर्शनामध्ये आहे. त्याशिवाय भारतीय राज्यघटनेची दुर्मिळ मूळ प्रत देखील वाचकांना येथे पाहता येणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी ग्रंथालयशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. सचिनकुमार पाटील, डॉ. शिवराज थोरात यांच्यासह ज्ञानस्रोत केंद्रातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▪️१५ जानेवारीपर्यंत वाचण्यासाठी पुस्तके मोफत
सदरचे ग्रंथ प्रदर्शन दि. १ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत सुरू राहणार असून ते सर्वांसाठी खुले आहे. या कालावधीमध्ये बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्रातील पुस्तके तेथेच बसून वाचण्यासाठी सर्वांसाठी विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वाचकांनी केंद्राला भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी करावी, तसेच त्यांना हव्या त्या पुस्तकांचे वाचन करावे. जास्तीत जास्त वाचकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सुतार यांनी केले आहे.