उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी
schedule16 Apr 26 person by visibility 60 categoryराज्य
कोल्हापूर : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मार्च ते जून या कालावधीत उष्माघाताचा धोका वाढत असून सध्या वातावरणातील बदलामुळे शहरातील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उष्माघात सारख्या जीवघेण्या स्थितीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
यामध्ये उन्हात दीर्घकाळ काम करणे, कारखान्यांतील उष्ण वातावरणात काम करणे, बंद व उष्ण खोलीत राहणे तसेच घट्ट कपडे परिधान करणे ही उष्माघाताची प्रमुख कारणे आहेत. वाढत्या तापमानाशी सतत संपर्क आल्यास शरीरावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. उष्माघाताची लक्षणे म्हणून त्वचा लालसर होणे, सूज येणे, ताप, डोकेदुखी, स्नायूंमध्ये गोळे येणे, अत्यधिक घाम येणे, थकवा, चक्कर, उलट्या होणे यांचा समावेश होतो. काही गंभीर प्रकरणांत त्वचा कोरडी व गरम होणे, नाडी वेगाने धडकणे आणि रुग्ण अर्धबेशुद्ध अवस्थेत जाणे अशी लक्षणेही दिसून येतात. नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून भरपूर पाणी पिणे, हलक्या व फिकट रंगाचे सैल कपडे वापरणे, उन्हात जाताना टोपी, गॉगल किंवा छत्रीचा वापर करणे तसेच घर थंड ठेवण्यासाठी पंखा, कुलर किंवा ओलसर पडद्यांचा वापर करणे आवश्यक आहे.
पाळीव प्राण्यांनाही सावलीत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याउलट, दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर पडणे टाळावे, कष्टाची कामे करू नयेत, लहान मुलांना पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, गडद व घट्ट कपडे वापरणे टाळावे तसेच मद्य, चहा, कॉफी आणि शीतपेये यांचे सेवन टाळावे, असेही सांगण्यात आले आहे. उष्माघात झाल्यास रुग्णाला तात्काळ सावलीत किंवा थंड ठिकाणी हलवावे, कपडे सैल करावेत, थंड पाण्याने अंग पुसावे आणि थोडेथोडे पाणी द्यावे. गंभीर स्थितीत रुग्णाला त्वरित रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे.
तरी संशयित उष्माघाताच्या रुग्णांनी विलंब न करता जवळच्या महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, वॉर्ड दवाखाना किंवा आरोग्यवर्धिनी केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.