डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा ‘ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मान
schedule27 Nov 25 person by visibility 86 categoryशैक्षणिक
▪️कझाकिस्तानमधील परिषदेत अमृता फडणवीस यांच्याहस्ते पुरस्कार
▪️डॉ. राजेश ख्यालप्पा, अजित पाटील यांनी स्वीकारला पुरस्कार
कोल्हापूर : लाखो रूग्णापर्यंत सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या कदमवाडी येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च इंस्टीटयूटचा ‘ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मान करण्यात आला. कझाकिस्तान येथे झालेल्या ‘इंटरनॅशनल बिझनेस एक्सलन्स समिट’ मध्ये बँकर अमृता फडणवीस यांच्याहस्ते ‘आऊटस्टँडिंग मेडिकल एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्विसेस इन वेस्टर्न महाराष्ट्र’ पुरस्काराने हॉस्पिटलचा गौरव करण्यात आला. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्यावतीने मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा आणि सहाय्यक कुलसचिव अजित पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
कझाकिस्तानच्या अल्माटी शहरामध्ये माध्यम क्षेत्रातील अग्रगण्य ग्रुप "नवभारत"च्यावतीने ‘ग्लोबल एक्सलन्स समिट’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या चर्चासत्रामध्ये उच्च शिक्षण, वैद्यकीय, कृषीसह विविध क्षेत्रातील तज्ञ सहभागी झाले होते. यावेळी भारतातील माजी राजदूत बलुत सार्सेनबाये, ‘नवभारत’चे संचालक वैभव माहेश्वरी उपस्थित होते.
या परिषदेत उच्च शिक्षण आणि कृषी क्षेत्रात ‘कझाकिस्तान आणि भारत यांच्यातील सहकार्याच्या संधी’ या विषयावर झालेल्या चर्चासत्रात डॉ. राजेश ख्यालप्पा यांनी सहभाग घेतला. मेडिकल शिक्षणासाठी कझाकिस्तान आणि भारतीय संस्थांमध्ये सहकार्य करार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी व प्राध्यापक यांची देवाण-घेवाण, त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सामंजस्य करार करण्यासाठी डी. वाय. पाटील ग्रुप पुढाकार घेण्यास तयार आहे. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या सिम्युलेशन लॅब विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हॉस्पीटलला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी अतिशय आनंद व्यक्त केला. गेल्या दोन दशकापासून रुग्णसेवेत आम्ही देत असलेल्या योगदानाचा हा गौरव आहे. गेल्या काही वर्षापसून हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत उपचार सुविधा दिली जात आहे. यापुढेही प्रत्येक गरजवंत रूग्णापर्यत आरोग्यसेवा पोहचविण्यासाठी आम्ही कार्यरत राहू अशी ग्वाही डॉ. पाटील यांनी दिली.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, उपधिष्ठता डॉ. पद्मजा देसाई, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे सर्व प्राध्यापक, डॉक्टर्स, परिचारिका, सहाय्यक, सर्व कर्मचारी, रुग्ण व नातेवाईक या सर्वांचे अभिनंदन केले आहे.