निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडा : जिल्हाधिकारी
schedule27 Nov 25 person by visibility 42 categoryराज्य
▪️मुरगुड, गडहिंग्लज, चंदगड व आजरा न.पा. भेटीतून घेतला आढावा
कोल्हापूर : मतदार जनजागृतीसह आदर्श आचारसंहितेचे पालन करून सर्व निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्ह्यातील मुरगुड, गडहिंग्लज, चंदगड व आजरा नगरपालिकांमधील कामकाजाचा आढावा त्यांनी प्रत्यक्ष भेटीतून घेतला. यावेळी स्ट्रॉंग रूम, स्थायी निरीक्षण पथक (एसएसटी), मतमोजणीबाबतची तयारी, ईव्हीएम यंत्र तयारी, मतपत्रिका छपाई, प्रशिक्षण, मतदान केंद्र अशा विविध ठिकाणी जाऊन कामकाजाबाबत आवश्यक सूचना केल्या. त्यांच्याहस्ते वोटर स्लीपचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा सहआयुक्त (नगर प्रशासन) नागेंद्र मुतकेकर यांच्यासह सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी ठिकठिकाणी सुरू असलेल्या प्रशिक्षण सत्रांमध्ये भेटी देत त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाच्या घटकांकडे लक्ष वेधले आणि महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्याचबरोबर मतदान केंद्रांना भेट देताना पिण्याचे पाणी, स्वच्छता, दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, मतदार व दिव्यांगांसाठी विशेष सुविधा, वाहन तपासणीची संख्या वाढवावी आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घ्यावी, अशा सूचना केल्या. मतमोजणी केंद्रावरही सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला. मतदानासाठी तयार होत असलेल्या ईव्हीएम यंत्राच्या पाहणीत त्यांनी अचूक तयारी करून सर्व यंत्रे दुरुस्त असल्याची खात्री करावी, अशी सूचना केली.
कुठेही तक्रार राहू नये, अशा सूचना केल्या. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगानेही त्यांनी उपस्थित निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचा आढावा घेतला.