डॉ सुनीलकुमार सरनाईक यांच्या "महाराष्ट्राच्या पुरोगामी पाऊलखुणा" या पुस्तकाला अक्षरगौरव पुरस्कार प्रदान
schedule02 Dec 24 person by visibility 313 categoryसामाजिक
▪️वाचनसंस्कृतीमुळेच सुसंस्कृत समाजाची निर्मिती : सुप्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे
मुंबई : कल्याण (पश्चिम) येथील अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान (रजि.) या संस्थेच्यावतीने दिनांक २९ व ३० नोव्हेंबरला "अखंड वाचन यज्ञ २०२४" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुविख्यात अभिनेते अरुण नलावडे यांच्या हस्ते " महाराष्ट्राच्या पुरोगामी पाऊलखुणा" या पुस्तकाचे लेखक डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांना अक्षरगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले, स्वरूप प्रकाशन पुणे या संस्थेने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा.डाॅ. प्रकाश पवार यांची प्रस्तावना लाभली आहे, मुंबई येथील करवीर काशी फौंडेशनचे विभाग प्रमुख पत्रकार धनंजय पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला, स्मृती चिन्ह, ग्रंथ, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी अभिनेते अरुण नलावडे म्हणाले, "वाचन संस्कृतीमुळेच सुसंस्कृत समाजाची निर्मिती होत असते. बदलत्या काळाबरोबर वाचनसंस्कृती लुप्त होत आहे, वाचन चळवळीला बळ देण्यासाठी अक्षरमंच प्रतिष्ठान सातत्याने कौतुकास्पद काम करत आहे.", अध्यक्षस्थानी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ इंदुराणी जाखड होत्या.
नलावडे पुढे म्हणाले, "आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, त्यामुळे मराठी भाषेच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या अक्षरमंच सारख्या संस्थांना शासनाने सर्वतोपरी मदत केली पाहिजे." यावेळी कुमार सुश्रुत याने ब्रेल लिपीमध्ये अभिवाचन करून आपल्या नैसर्गिक मर्यादांवर मात करत कोणत्याही परिस्थितीला तोंड देता येते असा संदेश दिला.
यावेळी हेमंत नेते यांच्या 'गोष्ट छोटी प्रेरणा मोठी' व श्रीकृष्ण काळकर यांच्या 'पानवाला' या पुस्तकाचे प्रकाशन रो.दिनेश मेहता(डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरी क्लब) व प्रेरणा रायचूर (चेअरमन,इनरव्हील क्लब) यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक अध्यक्ष डॉ.योगेश जोशी व सुत्रसंचलन सुकन्या जोशी यांनी केले. यावेळी डाॅ. सुश्रुत वैद्य, आरती कुलकर्णी, जयंत भावे, आरती मुळे, आदीं सह साहित्यप्रेमी वाचक उपस्थित होते. सचिव हेमंत नेहते यांनी आभार मानले.