जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून शेंडा पार्क परिसराची पाहणी
schedule29 Apr 26 person by visibility 112 categoryराज्य
कोल्हापूर : शहराच्या विस्तारामध्ये मैलाचा दगड ठरणारे शेंडा पार्क क्षेत्र भविष्यात जिल्ह्याचे मुख्य प्रशासकीय केंद्र म्हणून आकाराला येत आहे. या परिसरात प्रस्तावित असलेली जिल्हा प्रशासनाची मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कामाची, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर महानगरपालिका तसेच आयटी पार्क, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ (सर्किट बेंच) जागेची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केली. शेंडा पार्क येथील जागेचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी शासनाने विविध विभागांच्या कार्यालयांचे विक्रेंद्रीकरण करून ती एकाच छताखाली आणण्याचे नियोजन केले आहे.
यावेळी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपविभागीस अधिकारी मोसमी चौगुले, तहसिलदार स्वप्निल पवार, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, उपअभियंता शिवाजी इंगवले, अभियंता आशिष पाटील, रोहण येडगे उपस्थित होते.
येणाऱ्या काळात महत्त्वाच्या शासकीय विभागांची कार्यालये येथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व प्रशासकीय सोयी मिळतील. उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी आवश्यक असलेल्या जागेची आणि पायाभूत सुविधांची पाहणी करण्यात आली. पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना इमारतींचे बांधकाम करताना पुढील ५० वर्षांचा विचार करून प्रशस्त रस्ते, पार्किंग आणि मोकळी जागा ठेवावी. शेंडा पार्कचा नैसर्गिक वारसा जपत जास्तीत जास्त वृक्षारोपण आणि 'ग्रीन बिल्डिंग' संकल्पनेचा वापर करावा. सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता घेऊन कामाचा दर्जा राखून प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत अशा सूचना केल्या.