गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांच्या ठाम भूमिकेमुळे आ. आबिटकर यांना राधानगरी तालुक्यात मोठे बळ !
schedule25 Nov 24 person by visibility 266 categoryराजकीय
कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीत राधानगरी तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व बडे नेते, बिद्री भोगावतीचे आजी-माजी संचालक, तालुक्यातील गोकुळचे तीन संचालक महाविकास आघाडीच्या बाजूला गेले. राधानगरी तालुक्यात शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर एकाएकी पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. असे असतानाच त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच राधानगरी तालुक्यातील एक ज्येष्ठ नेते आणि गोकुळचे धडाडीचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेऊन महायुतीच्या पाठीमागे आपली ताकद उभा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव असलेले त्यांचे सुपुत्र अभिषेक डोंगळे यांनीही आपले सहकारी आणि युवाशक्तीच्या सहकार्याने मतदार संघात प्रचाराचे रान उठवून आबिटकर यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
अरुण डोंगळे हे गेली पस्तीस वर्षे गोकुळ च्या सत्तेत आहेत. राधानगरी -भुदरगड मधील वाड्या वस्त्यावर त्यांनी शेकडो दूध संस्था स्थापन करून कार्यकर्त्यांची जाळे विणले आहे. एखाद्या निवडणुकीत भाग घेतला की झोकुन देऊन त्यामध्ये उतरणे, पदरमोड करून उमेदवारासाठी यंत्रणा राबवणे, स्वतः उमेदवार समजून निवडणूक काळात अहोरात्र पायाला भिंगरी बांधून राबणे ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये आहेत.
श्री. डोंगळे यांचे सुपुत्र अभिषेक डोंगळे यांच्या युवाशक्ती चे शेकडो कार्यकर्ते ही प्रकाश आबिटकर यांच्या प्रचारात आघाडीवर राहिल्याने आबिटकर यांना राधानगरी मध्ये मताधिक्य मिळणे सुलभ झाले.
2019 ची विधानसभा निवडणूक लढविलेले राहुल देसाई,सत्यजित जाधव,जीवन पाटील हे सर्वजण केपींच्या बाजूला गेले असतानाच 2019 ची ही निवडणूक लढविलेले आणि या निवडणुकीत पराभूत उमेदवारात सर्वात जास्त मतदान घेतलेले अरुण कुमार डोंगळे यांनी आमदार आबिटकर यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे एकाकी पडलेल्या आ.आबिटकर यांना मोठा दिलासा मिळाला.