शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी अॅपव्दारे पिकांची नोंद 15 जानेवारी पर्यंत पूर्ण करा : जिल्हाधिकारी अमोल येडगे
schedule09 Jan 25 person by visibility 198 categoryराज्य
कोल्हापूर : पीक विमा, नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे, पीक कर्ज पुरवठा इत्यादी करिता पीक पाहणी नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात केलेल्या पिकांची नोंद ई पीक पाहणी अॅपव्दारे दिनांक 15 जानेवारी 2025 पर्यंत शेतकरी स्तरावर पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
"माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा" या उद्देशाने रब्बी हंगामाची पीक पाहणी ई पीक पाहणी अॅपव्दारे स्वतः नोंदविण्याची सुविधा सर्व शेतकऱ्यांना दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर मधून ई पीक पाहणी अॅप (Digital crop survey version 3.0.4) डाऊनलोड करुन व त्यात खाते क्र./गट क्र. निवडून नोंदणी करावी. शेतकऱ्यांना पीक पाहणी नोंदविण्याकरीता आपल्या गटामध्ये जाऊन पिकांचे फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे. तसेच हंगाम चालू पड किंवा कायमपड नोंदविण्यासाठी सुध्दा गटामध्ये जाणे आवश्यक आहे.
ई पीक पाहणी करण्यामध्ये काही समस्या असल्यास हेल्पलाईन क्रमांक 02025712712 वर फोन करुन मदत घेता येऊ शकते. इंटरनेटची आवश्यकता फक्त शेतकरी नोंदणी व पीक पाहणी अपलोड करणे कामी आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शेतामध्ये इंटरनेट सुविधा नाही त्या ठिकाणी सुध्दा पीक पाहणी करता येवून नंतर अपलोड करणे शक्य आहे.