SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयांची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली पाहणीनिर्मितीक्षम वाचन पद्धतीचा वापर करणे गरजेचे: डॉ. सुनीलकुमार लवटेसावित्रीबाई फुले रुग्णालयातील मॅटर्निटी ऑपरेशन थिएटर, लेबररुम पाच दिवस राहणार बंदकोल्हापूर : 23 कनेक्शन खंडीत करुन रुपये 9 लाख 14 हजार 504 इतकी थकीत रक्कम वसुलदुधाळी येथील 6 द.ल.लि. क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र जानेवारी अखेरपर्यंत कार्यान्वीत करा : के.मंजूलक्ष्मीकोल्हापूर : घरफाळा थकबाकीपोटी 4 व्यावसायिक मिळकती सीलडीकेटीईमध्ये इस्त्रो आणि विज्ञान भारतीच्या संयुक्त विद्यमानाने आउटरिच प्रोग्रम उत्साहातशेतकऱ्यांनी ई पीक पाहणी अॅपव्दारे पिकांची नोंद 15 जानेवारी पर्यंत पूर्ण करा : जिल्हाधिकारी अमोल येडगेकोल्हापूर : लाईन बाजार परिसरात गस्त वाढवा : 'आप'चे पोलिसांना निवेदनमुस्लिम समाजातील पहिली शिक्षिका : फातिमा शेख

जाहिरात

 

मुस्लिम समाजातील पहिली शिक्षिका : फातिमा शेख

schedule09 Jan 25 person by visibility 205 categoryसामाजिक

गोरगरीब, शोषित पीडित, अस्पृश्य, शूद्रादीशूद्र समाजाला हजारो वर्षांपासून शिक्षणाची संधी मिळत नव्हती, या महान आणि पवित्र कार्याला ज्यांनी स्वतःचे घर देऊन महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सोबत राहून महत्त्वपूर्ण योगदान दिले अशा मुस्लीम समाजातील पहिल्या शिक्षिका महान मां. फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त..

महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्त्री शिक्षणाच्या व अस्पृश्य निवारणाच्या कार्यात फातिमा शेख व उस्मान शेख या मुस्लिम समाजातील बहिण भावाचे मौलिक सहकार्य झाले होते, मात्र फातिमा व उस्मान शेख यांचा पूर्वेतिहास तसेच फुले दाम्पत्यांच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दिलेल्या खंबीरपणे पाठींब्याची व सहकार्याची फारशी माहिती उजेडात आलेली नाही.

फातिमा व उस्मान शेख हे मुळचे नाशिक जिल्ह्यातील मालेगावचे. १८५७ च्या बंडा नंतर उत्तर प्रदेशातील जुलाहा (विणकर) समाजातील अनेक कुटुंबे महाराष्ट्रातील मालेगाव, धुळे, भिवंडी, मुंबई येथे येऊन स्थायिक झाली होती. फातिमा व उस्मान शेख यांच्या लहानपणी त्यांच्या आईवडिलांचे छत्र हरपले होते. त्यामुळे ते पोरके झाले होते.

       त्यातच एके वर्षी मालेगाव (जि. नाशिक)मध्ये भयंकर दुष्काळ पडला. जुलाहा (विणकर) समाजाने तयार केलेल्या कपड्यांची मागणी घटली. कपड्यांची विक्री होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. शेवटी मालेगाव मधील अनेक जुलाहा कुटुंबे मालेगाव सोडून पुण्यात आली. फातिमा व उस्मान शेख ही त्यांच्या समाजाबरोबर पुणे येथे आले. पुण्यातील गंजपेठेत गफ्फार बेग नावाचे सद्ग्रहस्थ‌ रहात होते, त्यांनी फातिमा व उस्मान शेख यांना रहाण्यासाठी आपली जागा दिली. उस्मान आता शाळेत जाण्याइतका मोठा झाला होता. गफार बेग यांनी त्याला जवळच्या शाळेत घातले, त्याच शाळेत जोतीराव फुले हे ही शिकत होते,  ते उस्मानचे वर्गातच होते, त्यामुळे त्या दोघांमध्ये मैत्री झाली. शालेय जीवनापासून सुरू झालेली ही मैत्री पुढे ही दृढ झाली.

केवळ शिक्षण नसल्याने बहुजनांवर आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अन्याय होत आहे, व सर्वच पातळीवर त्यांची प्रगती खुंटली आहे, तेव्हा शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे लक्षात आल्यावर जोतीराव फुले यांनी मुलींना व अस्पृश्यांना शिक्षण देण्यासाठी पुण्यात शाळा सुरू केली. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई ही त्यांच्या कार्यात मदत करीत होत्या. त्यांच्या कार्याची माहिती हळूहळू सर्वत्र पसरली. फातिमाला जेव्हा फुले दाम्पत्याच्या या महान कार्याबद्दल समजले तेव्हा तिनें त्यांची भेट घडवून आणण्यासाठी उस्मानकडे आग्रह धरला.उस्मानने आनंदाने ते कबूल केले.

एके दिवशी अचानक गफार बेग जोतीराव व सावित्रीबाई यांना घेऊन त्यांचेकडे आले. जोतीराव व सावित्रीबाई यांना पाहून फातिमाला मनस्वी आनंद झाला व आश्चर्य ही वाटले. त्यावर गफार बेग यांनी खुलासा केला की, ब्राह्मण समाजाच्या रोषाला व दबावाला बळी पडून जोतीराव यांचे वडील गोविंदराव फुले यांनी या दोघांना घराबाहेर काढले आहे व त्यांना आश्रयाची गरज आहे. उस्मानने लगेच एक खोली त्यांना राहण्यासाठी दिली.

जोतीरावांच्या आईचे निधन त्यांच्या लहानपणीच झाले होते. त्यानंतर त्यांचे पालनपोषण सगुणाबाई या महिलेने केले होते व त्यांना आईचे प्रेम दिले होते. जोतीराव व सावित्रीबाई यांना गोविंदरावांनी घराबाहेर काढले आहे, हे समजताच सगुणाबाई त्यांचा शोध घेत घेत उस्मानच्या घरी आल्या, त्यांनी जोतीराव व सावित्रीबाई यांची भेट घेतली. झालेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले व त्यांच्याबरोबर त्या ही काम करु लागल्या.

 फातिमा ही जोतीराव व सावित्रीबाई यांच्या बरोबर दिवसरात्र सावलीसारखी रहात होती. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यात मदत करीत होती. सावित्रीबाई, सगुणाबाई व इतर महिलांना घेऊन ती घरोघरी जाऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊ लागली. विशेषतः स्त्री शिक्षणाचा प्रसार करू लागली. 
      
फातिमा अशिक्षित होती. पण तीला शिकण्याची मनापासून आवड होती. त्यामुळे तिनें प्रथम जोतीराव व सावित्रीबाई यांच्या प्रौढांसाठी असणाऱ्या शाळेत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ती ट्रेंड (प्रशिक्षित) शिक्षिका झाली व तिने जोतीराव, सावित्रीबाई, गफार मुन्शी बेग, वाळवेकर, गोवंडे, परांजपे, तात्यासाहेब भिडे, लहुजी वस्ताद, व सावित्रीबाईंच्या महिला सहकारी यांचे बरोबर शिक्षण प्रसारासाठी वाहून घेतले.

 मुस्लिम समाजातील मुल्ला मौलवींचा स्त्री शिक्षणाला विरोध असतानाही तो न जुमानता मुस्लिम मोहल्ल्यात घरोघरी जाऊन फातिमा ने शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.व  मुलामुलींना शाळेत पाठवण्याचे आवाहन करू लागली. या कार्यात ती बऱ्याच प्रमाणात यशस्वी ही झाली.

 जोतीरावांनी पहिल्यांदा मुलींची शाळा काढली. त्यानंतर रात्रीची प्रौढ शिक्षण संस्था काढली. त्यानंतर ट्रेंड (प्रशिक्षित)शिक्षकांची शाळा व विधवांसाठी महिलाश्रम असे अनेक उपक्रम सुरू केले.या सर्व कामात फातिमा सहभागी झाली होती. व जोतीरावांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत होती. सावित्रीबाई बरोबर तिने ही सनातन्यांच्या विरोधाला तोंड दिले होते, दगडधोंडे,शेण, शिव्याशाप यांचा मारा सहन केला होता, 

  पुण्यासारख्या कर्मठ शहरात २६ जानेवारी १८५३ रोजी जोतीराव यांनी विधवा व परीतक्त्या महिलांच्या बाळंतपणासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले, या कार्यात उस्मान व फातिमा यांनी त्यांना मदत करून त्यांचे मनोधैर्य वाढविले. सावित्रीबाईंनी त्यासाठी खास बाळंतपणासाठी लागणारे सुतिकाचे(नर्सिंग) प्रशिक्षण (ट्रेनिंग) घेतले.फातिमाने ही सुईनींकडून ट्रेनिंग घेतले. व ती त्यांना मदत करू लागली.

 ब्रिटिश सरकारने जोतीराव व सावित्रीबाई यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन १६ नोव्हेंबर १८५२ रोजी त्यांचा भव्य समारंभपूर्वक सत्कार आयोजित केला होता, जोतीराव यांच्या विनंतीवरून त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षिकांचाही सत्कार करण्यात आला, त्यात आवर्जून फातिमाचा ही सत्कार करण्यात आला.

 १८५६ मध्ये सावित्रीबाई काही दिवसांसाठी माहेरी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मुख्याध्यापिका म्हणून फातिमा शेख हिच्यावर जबाबदारी सोपवली होती.पण नायगाव येथे सावित्रीबाई आजारी पडल्यामुळे त्यांचा मुक्काम बरेच दिवस वाढला. या काळात फातिमाने मुख्याध्यापक पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. फातिमाच्या कामाची ब्रिटिश अधिकारी व शिक्षणतज्ज्ञ यांनी प्रशंसा केली. फातिमा ही मुख्याध्यापक पदासाठी योग्य आहे असे सर्वांचेच मत होते, त्यामुळे जोतीराव व सावित्रीबाई यांनी तिला मुख्याध्यापक केले.

 दरम्यान फातिमा चे लग्नाचे वय झाले होते, म्हणून जोतीराव यांनी योग्य स्थळ पाहून तिचे लग्न लावून दिले. त्यावेळी मुस्लिम समाजातील रिवाजाप्रमाणे हुंडा (दहेज) द्यावे लागत होता, पण जोतीरावांनी हुंडा प्रथेला विरोध तर केलाच शिवाय लग्नाचा खर्च दोन्ही बाजूंनी समान केला गेला.

जोतीराव व सावित्रीबाई यांच्या प्रत्येक शैक्षणिक व सामाजिक कार्यात फातिमा व तिचा भाऊ उस्मान यांचे महत्वाचे योगदान आहे. जोतीरावांच्या वडिलांनी त्यांना बाहेर काढल्यानंतर उस्मानने त्यांना रहायला खोली तर दिलीच, शिवाय सर्व बाजूने आधार दिला.त्यांना निःस्पृहपणे व निर्भीडपणे साथ दिली.

 ✍️ डॉ. सुनीलकुमार सरनाईक, कोल्हापूर.
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत.)

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes