उचगाव येथील मणेर माळ परिसरात विद्यार्थ्यासह दोघांवर जीवघेणा हल्ला
schedule28 Nov 24 person by visibility 308 categoryगुन्हे
कोल्हापूर : उचगाव येथील मणेर माळ परिसरात तरुणांचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या दोघांवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला झाला. बुधवारी (दि. २७) रात्री घडलेल्या घटनेत कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणारा विद्यार्थी गौरव पोवार (वय २०, सध्या रा. सरनोबतवाडी, मूळ रा. सोलापूर) याच्यासह विनायक महादेव माळी (३०, रा. उचगाव) हे जखमी झाले . दरम्यान हल्ला करणाऱ्या दोघांचा शोध गांधीनगर पोलीस घेत आहेत.
मणेरमाळ परिसरातील एका बियर शॉपी जवळ तरुणांच्या दोन गटात हाणामारी सुरू होती. वाद सोडवण्यासाठी गौरव पोवार आणि विनायक माळी पुढे गेले. त्यांनी तरुणांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी काही तरुणांनी धारदार शस्त्रांसह दोघांवर हल्ला केला.
या घटनेत गौरव पोवार याच्या पोटात खोलवर जखम लागल्याने तो जमिनीवर कोसळला तर विनायक माळी यांच्या डोक्याला दुखापत झाली. जीवघेण्या हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. तातडीने जखमींना सीपीआरमध्ये दाखल केले. पोवार याच्या पोटात आणि फुफ्फुसाला दुखापत झाली आहे त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.