पाणीपट्टी थकबाकी तात्काळ भरण्याचे महापालिकेचे आवाहन; अनधिकृत कनेक्शन आढळल्यास 25 हजारांचा दंड व फौजदारी कारवाई
schedule12 Sep 26 person by visibility 57 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत नळ कनेक्शन तसेच पाणीपट्टी थकबाकीदारांविरोधात आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अनधिकृत नळ कनेक्शनधारकांना दि. 12 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2026 या कालावधीत आपले कनेक्शन अधिकृत करून घेण्याची संधी देण्यात आली आहे. या कालावधीत कनेक्शन अधिकृत करून न घेतल्यास संबंधितांवर महासभा ठरावानुसार 25 हजार रुपये दंड तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या वशि-1/679/2026, दि. 1 सप्टेंबर 2026 रोजीच्या आदेशान्वये पाणीपट्टी वसुली तसेच अनधिकृत नळ कनेक्शनवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या वतीने चार उपद्रव शोध पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांसोबत महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी गुरुवारी, दि. 10 सप्टेंबर रोजी आयुक्त कार्यालयातील बैठक हॉलमध्ये पाणीपट्टी वसुली व अनधिकृत नळ कनेक्शनबाबत आढावा बैठक घेतली.
शहर व उपनगरातील ज्या नळ कनेक्शनधारकांकडे पाणीपट्टीची थकबाकी आहे, अशा थकबाकीदारांचे नळ कनेक्शन वसुली पथकांमार्फत खंडित करण्याची कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. भारूड यांनी दिले आहेत.
तसेच अनधिकृत नळ कनेक्शन, नळ कनेक्शनला थेट मोटर लावून पाण्याचा वापर करणे किंवा चोरीच्या मार्गाने पाणी वापरणे आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जल अभियंता, शाखा अभियंता, पाणीपट्टी अधीक्षक आणि सर्व मीटर रिडर्स यांना देण्यात आले आहेत.
महापालिकेची मंजुरी न घेता अधिकृत प्लंबरने नळ कनेक्शन जोडून दिल्याचे आढळल्यास संबंधित प्लंबरचा नळ कारागीर परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, अनधिकृत नळ कनेक्शन असलेल्या नागरिकांना ते नियमित करण्यासाठी दि. 12 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2026 या कालावधीत महापालिकेच्या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे. यासाठी https://web.kolhapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेला अनधिकृत नळ कनेक्शनचा फॉर्म भरून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी.
नागरिकांनी कारवाई टाळण्यासाठी आपल्या नळ कनेक्शनची स्थिती तपासून घ्यावी. अनधिकृत कनेक्शन असल्यास दिलेल्या मुदतीत ते अधिकृत करून घ्यावे तसेच पाणीपट्टीची थकबाकी तात्काळ भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.