मतदान केंद्रावरील ३२४५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण यशस्वी
schedule28 Dec 25 person by visibility 55 category
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने २० प्रभागांतील ५९५ मतदान केंद्रांवर नेमणूक करण्यात आलेल्या ३२४५ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पहिले हॅण्ड्स-ऑन प्रशिक्षण रविवारी यशस्वीरीत्या पार पडले.
हे प्रशिक्षण स्वामी विवेकानंद कॉलेज, व्ही.टी. पाटील हॉल (राजारामपुरी), स. म. लोहिया रामगणेश गडकरी सभागृह (पेटाळा) तसेच राजाराम कॉलेज अशा चार ठिकाणी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेतले. या सर्व प्रशिक्षण केंद्रांना अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व प्रशिक्षणाचा आढावा घेत संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.
महानगरपालिकेच्यावतीने सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. त्याअंतर्गत सकाळी १० ते दुपारी १ व दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत विविध ठिकाणी टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात आले. कसबा बावडा महासैनिक प्रशिक्षण केंद्र, राजारामपुरी, दुधाळी पॅव्हेलियन, राजोपाध्येनगर, गांधी मैदान, दसरा चौक शहाजी कॉलेज तसेच मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील एकूण ३२४५ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला.
या प्रशिक्षणामध्ये निवडणूक प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, आदर्श आचारसंहिता, मतदान व मतमोजणी प्रक्रिया, कायदेशीर बाबी, ईव्हीएम मशिनची प्रत्यक्ष हाताळणी तसेच आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कोणतीही त्रुटी, गोंधळ किंवा गैरप्रकार टाळून निवडणूक प्रक्रिया विश्वासार्ह व पारदर्शक राहावी, हा प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
सदर प्रशिक्षण प्रशासक तथा निवडणूक निर्णय अधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी अतिरिक्त रविकांत अडसुळ, आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, निवडणूक निर्णय अधिकारी संदीप भंडारे, एकनाथ काळबांडे, शक्ती कदम, सुशील संसारे, हरेश सुळ, समीर शिंगटे, श्रीमती रुपाली चौगुले तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भालचंद्र यादव, दिगंबर सानप, ऋतूराज निकम, विजय जाधव, श्रीमती रोहिणी गायगोपाळ, संजय काटकर, सुधीर वाघमारे, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाने, कृष्णा पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, उपजल अभियंता रावसाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.





