डिजिटल फसवणूक टाळण्यासाठी मोबाईलचा वापर जागरूकपणे करा : रूपाली घाटगे; राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम उत्साहत
schedule24 Dec 25 person by visibility 69 categoryराज्य
कोल्हापूर : सायबर क्राईम आणि डिजिटल फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे प्रत्येक ग्राहकाने मोबाईल वापरताना जागरूक राहणे गरजेचे आहे. फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहा, असा सल्ला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्य रूपाली घाटगे यांनी दिला. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त भवानी मंडप येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी 'ग्राहक प्रबोधन स्टॉल'चे उद्घाटन करण्यात आले.
रूपाली घाटगे म्हणाल्या की, ग्राहक चळवळीमधील संघटनांचे काम उत्तम सुरू आहे. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकांना ६ अधिकार देण्यात आले आहेत. या अधिकारांचे उल्लंघन झाल्यास दाद मागण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. २०१९ च्या नवीन कायद्यामुळे ग्राहक आणि ग्राहक न्यायालयाच्या अधिकारात वाढ झाली असून, ग्राहकांना जास्तीत जास्त न्याय मिळण्याचे प्रमाणही वाढले आहे. ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक असणे गरजेचे आहे. ग्राहक न्यायालय 'अंतरिम आदेश' देऊ शकते, यामुळे कोणत्याही ग्राहकावर अन्याय झाल्यास त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
स्वागत व प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले. त्या म्हणाल्या की, ग्राहक दिन हा केवळ एक दिवस नसून तो दररोज असला पाहिजे. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार काम करून ग्राहकांचे हित जोपासणे हेच आपले प्रथम कर्तव्य आहे. ग्राहक हा केंद्रबिंदू मानून आपण कामकाज केले पाहिजे. पुरवठा विभाग आता पूर्णपणे ऑनलाईन झाला आहे. सर्वच सेवा ऑनलाईन देणारा राज्य शासनाचा हा एकमेव विभाग असल्याचेही त्यांनी नमूद केले. ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी ऑनलाईन कामकाजावर भर दिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त उदय लोकरे, अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन काळे, पुरवठा निरीक्षक महेश काटकर, नम्रता कुडाळकर, अक्षया पाटील, बाबासाहेब शिंदे, बीएसएनएलचे विजयानंद माने यांच्यासह ग्राहक व रेशन दुकानदार उपस्थित होते. ग्राहक पंचायतीचे बी. जे. पाटील, जगन्नाथ जोशी, जगदीश पाटील आणि अरुण यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन रेशन संघटनेचे रवी मोरे यांनी केले.
या कार्यक्रमात कृषी, महावितरण, बँक, राज्य परिवहन विभाग, गॅस कंपनी, बीएसएनएलसह विविध शासकीय विभागांचे स्टॉल उपलब्ध होते. तसेच 'एकल प्लास्टिकचा (सिंगल युज प्लास्टिक) वापर करणार नाही', अशी शपथ यावेळी सर्वांनी घेतली.





