रामोशी, बेडर समाजाच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
schedule07 Sep 25 person by visibility 191 categoryराज्य

▪️आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती
दोन लाख रुपयांचे बिगर तारण, उद्योग-व्यवसायासाठी १५ लाख रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय
पुणे : रामोशी-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळा’च्या माध्यमातून दोन लाख रुपयांपर्यंतचे बिगर तारण कर्ज, तसेच समाजात उद्योजक व व्यावसायिक घडावेत यासाठी १५ लाख रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. रामोशी समाजाच्या विकासासाठी यापुढेही सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३४ व्या जयंतीनिमित्त पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंह भोसले, आमदार विजय शिवतारे, गोपीचंद पडळकर, राहुल कुल, विक्रम पाचपुते, माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर, माजी आमदार संजय जगताप, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, दौलत शितोळे, अंकुश जाधव, मोहन मदने आदी उपस्थित होते.
इंग्रजांविरुद्ध पहिली ठिणगी पेटवणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हे खऱ्या अर्थाने क्रांतिकारक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणेच त्यांनी गनिमी काव्याच्या सहाय्याने ब्रिटिशांना धडा शिकवला. समाजाच्या शौर्याची परंपरा आजही जिवंत असून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
रामोशी-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजाला दोन लाख रुपयांपर्यंतचे बिनतारण कर्ज, तर उद्योजक व व्यावसायिक घडावेत यासाठी १५ लाख रुपयांचे कर्ज देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पोलीस भरतीसाठी विशेष योजना, तसेच शिक्षण व प्रशिक्षणाकरिता महाज्योती आणि सारथीमार्फत योजना राबवल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शासनाने ओबीसी मंत्रालय, महाज्योती आणि विविध महामंडळे स्थापन करून विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती, ४२ वसतिगृह व विविध प्रशिक्षण योजना सुरू केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्य उभारले, त्यांचे शिवकार्य पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व जातींना मुख्य प्रवाहात आणणे, हेच शासनाचे ध्येय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, उमाजी नाईक हे इंग्रजांच्या विरोधात संघर्षाची ठिणगी पेटवणारे पहिले नेते होते. रॉबर्टने ब्रिटिशांना लिहिलेल्या पत्रात “उमाजी नाईक गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच लढतात” असा उल्लेख केला आहे. अन्यायाविरुद्ध उभे राहत त्यांनी सामान्यांसाठी अज्ञापत्र काढले. त्यांच्या कार्याची दखल घेत इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी 10 हजार रुपयांचे इनाम जाहीर केले होते. रामोशी-बेडर समाजाला घाबरवण्यासाठी इंग्रजांनी त्यांना फाशी दिली; तरीही हा समाज स्वातंत्र्यलढ्यात मागे राहिला नाही. इंग्रजांच्या कारस्थानामुळे समाजावर गुन्हेगारीचा शिक्का बसला, जो स्वातंत्र्यानंतर पाच वर्षांनी पुसला गेला.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळेच राज्यात इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र मंत्रालय, स्वतंत्र मंत्री व विविध महामंडळे अस्तित्वात आली. महाज्योतीसारख्या संस्थेमुळे अनेक वंचित घटकांतील तरुण तहसीलदार, पोलीस निरीक्षक, वैमानिक होऊ शकले.
आमदार पडळकर यांनी आपल्या मनोगतात राज्य शासनाने इतर मागासांसाठी केलेल्या कामांची माहिती सांगून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे स्मारक होत असल्याचे आणि आता पुरंदर येथे राजे उमाजी नाईक यांचे पाच एकरमध्ये स्मारक उभारले जाणार असल्याचे सांगितले.
जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे यांनी प्रास्ताविकात रामोशी-बेडर समाजाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी रामोशी समाजाच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा माहितीपटही दाखविण्यात आला.
कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते माजी मंत्री दिवंगत गिरीश बापट, माजी आमदार दिवंगत बाबुराव पाचर्णे, दिवंगत रामभाऊ जाधव, दिवंगत सुनील चव्हाण यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार, तर बाबुराव जमादार, छगन जाधव व बाबुराव चव्हाण यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाने उभा केलेल्या कक्षाला भेट देऊन राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्र्यांनी राजे उमाजी नाईक स्मृतिस्थळास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.