शिक्षकांची भूमिका समाजाला दिशादर्शक : डॉ. विश्वास सुतार
schedule08 Sep 25 person by visibility 197 categoryसामाजिक

कोल्हापूर : शिक्षण हे समाजाला दिशा देण्याचे साधन असल्याने बदलत्या काळात शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन शाहुवाडी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी तथा प्र. गटशिक्षणाधिकारी डॉ.विश्वास सुतार यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील दूर शिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने “बदलत्या काळातील शिक्षकाची भूमिका” या विषयावर आयोजित ऑनलाईन विशेष व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. दूर शिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ.कृष्णा पाटील अध्यक्षस्थानी होते.
डॉ. सुतार म्हणाले, शिक्षकांचा शिक्षक होण्यात आनंदायी गोष्ट आहे.शिक्षक हा आजन्म विद्यार्थी असला पाहिजे. माजी राष्ट्रपती डॉ.राधाकृष्ण सर्वपल्ली यांचा जन्म दिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.त्याच बरोबर डॉ.जे.पी नाईक यांचा ही जन्मदिन शिक्षक दिनादिवशी आहे.डॉ.नाईक यांनी शिक्षणातून देशाला दिशा देण्याचे काम केले आहे.सर्वांसाठी शिक्षण ही संकल्पना शैक्षणिक क्षेत्रात रुजविण्याचे काम केले त्यांचे स्मरण करणे गरजेचे आहे.
डॉ. सुतार म्हणाले, शिक्षकाकडे विज्ञाननिष्ठ, नैतिकता,मानवी आणि संविधानिक मुल्ये असली पाहिजेत.शिक्षकांनी विद्यार्थी केंद्रित कालसुसंगत अशी प्रतिमा निर्माण करणे हे शिक्षका पुढचे आव्हान आहे. कामाप्रती,विद्यार्थीप्रती आणि ज्ञानाप्रती निष्ठा बाळगणारा शिक्षक होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करताना भान ठेवले पाहिजे. तंत्रज्ञान हे साधन आहे साध्य नाही हे लक्षात घेतले पाहिजे. ज्ञानशील, कर्मशील व भावशील विद्यार्थी शिक्षकांनी घडविले पाहिजेत.शिक्षकाने जागल्याची भूमिका पार पाडली पाहिजे.शिक्षक,निसर्ग आणि पुस्तके ही विद्यार्थ्यांना उर्जा देण्याचे काम करतात.वाचन हा आपल्या जीवनाचा श्वास असला पाहिजे. शिक्षक हा वाचक,सृजनशील आणि साधन समृद्ध म्हणजे ग्रंथाने समृद्ध असला पाहिजे.
डॉ.कृष्णा पाटील म्हणाले, बदलत्या काळात विधायक विश्वास देण्याचे व भूमिका घेण्याचे काम शिक्षक देऊ शकतो. समाजाला मानवी चेहरा देण्याचे आणि माहितीच्या महाजाळात सत्यता शोधण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे.शिक्षक माहितीचा पुरवठा करीत नाही तर ज्ञानाचा साठा देतो.
डॉ. संजय चोपडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. समन्वयक डॉ.चांगदेव बंडगर यांनी परिचय करून दिला. केले. डॉ. प्रकाश बेळीकट्टी यांनी सूत्रसंचालन केले, तर विद्यार्थिनी राधिका दरवेशी (सातारा) यांनी आभार मानले. यावेळी उपकुलसचिव व्ही.बी. शिंदे यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.