स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत उद्योजक मेळाव्याचे आयोजन
schedule08 Sep 25 person by visibility 248 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर व दे आसरा फाउंडेशन आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवन, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम विनामुल्य असून नोंदणी आवश्यक आहे. विविध क्षेत्रांतील सूक्ष्म, लघु व नवउद्योजक एकत्र आणून ज्ञानाची देवाणघेवाण करणे, नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध करुन देणे तसेच व्यवसाय वाढीसाठी आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे. व्यवसाय वाढविण्यासाठी तज्ञांचे अचूक मार्गदर्शन मिळणार आहे.
व्यवसाय वृध्दीचे रहस्य : योग्य मार्केटिंग आणि सेल्स धोरण याविषयी अनिल वाडीकर, ग्रोथ मार्केटिंग एक्स्पर्ट हे सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. उद्योजक कट्टा कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील सुप्रसिध्द उद्योजक महेश तोरगळकर, संस्थापक ॲडव्हान्सन्ड इंजिनिअरींग यांच्यासोबत खास बातचीत आणि प्रश्नोत्तरे होणार आहेत. तसेच स्वयंरोजगार विषयक कर्ज देणारी सर्व शासकीय महामंडळांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत.
ज्यांना व्यवसाय सुरु करायचा आहे आणि ज्यांचा व्यवसाय सुरु आहे अशा इच्छुक उद्योजक, नवउद्योजकांनी https://forms.gle/M1nWMzbT93GYijEm9 या गुगल फॉर्म मध्ये नोंदणी करुन मेळाव्यास उपस्थित रहावे. तसेच अधिक माहितीसाठी 0231-2545677 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.