कोल्हापुरात उद्या होणार 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती राष्ट्रीय अभियान २०२६' चा महासमापन सोहळा
schedule24 Jul 26 person by visibility 103 categoryसामाजिक
◼️पीपल्स पार्टी ऑफ इंडियातर्फे भव्य आयोजन
कोल्हापूर : सामाजिक समता, बंधुता, न्याय आणि लोकशाही मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी देशभरात राबविण्यात आलेल्या 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती राष्ट्रीय अभियान २०२६' चा महासमापन सोहळा उद्या दिनांक २५ जुलै २०२६ रोजी कोल्हापुरात अत्यंत उत्साहात पार पडणार आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून सुरू झालेल्या या महत्त्वाच्या अभियानाचा सांगता सोहळा महाराष्ट्रात होत असून, यानिमित्ताने दुपारी २:०० वाजता महासैनिक दरबार हॉल, सर्किट हाऊस रोड, कोल्हापूर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या भव्य कार्यक्रमात 'एक राष्ट्र: समान शिक्षण आणि लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व क्षेत्रांत प्रतिनिधित्व', महिला सक्षमीकरणासाठी सर्व वर्गातील महिलांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ५० टक्के भागीदारी, तसेच 'राष्ट्रीकरणाचा पैगाम: निजीकरण को लगाम' या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवर देशातील आणि राज्यांतील दिग्गज नेते मार्गदर्शन करणार आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन, वंचित, शेतकरी व महिलांच्या उद्धारासाठी आणि सामाजिक आरक्षणाची अंमलबजावणी करून ज्या कल्याणकारी राज्याची स्थापना केली, त्यांच्या याच विचारांना जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान अत्यंत प्रभावी ठरले आहे.
या कार्यक्रमास पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. के. एस. चौहान, महासचिव हेमराजसिंह पटेल, राष्ट्रीय प्रवक्ते बी. डी. बोरकर तसेच पक्षाचे इतर वरिष्ठ कार्यकर्ते आणि पदाधिकारी विशेष उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. सामाजिक परिवर्तन आणि संविधानाच्या मूल्यांना अधिक सशक्त करणाऱ्या या ऐतिहासिक महासमापन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.