गोकुळ’च्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न
schedule15 May 24 person by visibility 392 categoryउद्योग

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. कोल्हापूर (गोकुळ) सोलर ओपन ऍक्सेस स्कीम अंतर्गत ६.५ मेगा वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी मे.सर्जन रिॲलिटीज प्रा.लि.पुणे यांच्या करमाळा येथील सोलर पार्क मध्ये संघाने खरेदी केलेल्या १८ एकर जागेचा भूमिपूजन समारंभ गोकुळचे संचालक अजित नरके व अभिजित तायशेटे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत सोमवार दि.१३ मे. रोजी करमाळा जि.सोलापूर येथे संपन्न झाला.
यावेळी बोलताना संघाचे संचालक अजित नरके म्हणाले कि, सध्या गोकुळ मुख्यालयाकडील वर्षाकाठी जवळजवळ वीज बिलाचा खर्च १३ कोटी इतका येतो. हा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे ठरविले त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यामध्ये २०० एकरवर पुणे येथील सर्जन रिॲलिटीज प्रा.लि.ही कंपनी सौर ऊर्जा निर्मिती करत आहेत यापैकी गोकुळने १८ एकर जागा खरेदी केली असून या जागेमध्ये ६.५ मेगा वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जारणार आहे. व त्याद्वारे वीज निर्मिती केली जाईल. एकूणच वार्षिक खर्चामध्ये बचतच होणार आहे असे सांगितले.
सदर सौर ऊर्जा प्रकल्पाचा जागेसह खर्च रुपये ३३ कोटी ३३ लाख इतका होणार आहे व या प्रकल्पामुळे गोकुळ मुख्यालयाकडील वीज बिलामध्ये प्रतिवर्षी अंदाजे रुपये ६.५० कोटी इतकी बचत होणार आहे. सदर प्रकल्प ३१ जुलै २०२४ पर्यंत पूर्णत्वास जाऊन ऑगस्ट २०२४ पासून प्रत्यक्षात वीज निर्मिती सुरू होणार असल्याचे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले.
याप्रसंगी संघाचे संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, व्यवस्थापक अभियांत्रिकी प्रताप पडवळ, सहा.व्यवस्थापक इलेक्ट्रिकल ए.आर.कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, तसेच मे.सार्जन रिॲलिटीज प्रा.लि.पुणे चे प्रतिनिधी राजेश बांदल, सतीश व्यवहारे व संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.