सावधान! कोल्हापुरात १६ मार्चपासून 'हेल्मेट' सक्ती; विना हेल्मेट टोल नाक्यावर 'नो एन्ट्री'
schedule04 Mar 26 person by visibility 149 categoryगुन्हे
🔳 प्रादेशिक परिवहन विभागाचा मोठा निर्णय; महामार्गावर दुचाकीस्वारांची होणार कडक तपासणी
कोल्हापूर: प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यात रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण आणि त्यामध्ये होणारी जीवितहानी रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) कंबर कसली आहे. येत्या १६ मार्चपासून जिल्ह्यात विशेष हेल्मेट तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
'नो हेल्मेट, नो एन्ट्री' मोहिमेचा धडाका केवळ शहरातच नव्हे, तर आता राष्ट्रीय महामार्गावरही विना हेल्मेट दुचाकी चालवणे महाग पडणार आहे. जिल्हा प्रशासनाने कागल आणि किणी टोल नाका तसेच सीमा तपासणी नाक्यांवर “No Helmet No Entry” अभियान सुरू केले आहे. हेल्मेट नसेल तर दुचाकीस्वारांना महामार्गावर प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
मागील सीटवरील प्रवाशालाही हेल्मेट अनिवार्य अपघातात डोक्याला होणारी गंभीर दुखापत टाळण्यासाठी केवळ चालकानेच नव्हे, तर मागील आसनावर बसलेल्या प्रवाशानेही हेल्मेट परिधान करणे कायद्याने अनिवार्य आहे. हेल्मेटचा पट्टा (Strap) घट्ट बांधलेला असणे आवश्यक आहे, अन्यथा ती कारवाईपात्र चूक मानली जाईल.
"हेल्मेटचा वापर हे केवळ कायदेशीर बंधन नसून स्वतःचा जीव वाचवण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे. नागरिकांनी 'हेल्मेट वापरा-जीवन वाचवा' हा मंत्र अंमलात आणावा आणि महामार्गावर विना हेल्मेट प्रवास टाळावा." असे आवाहन संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर यांनी केले आहे
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात दुचाकी अपघातात वाढ झाली आहे. अनेक प्रकरणांत हेल्मेट नसल्यामुळे डोक्याला गंभीर इजा होऊन मृत्यू ओढवल्याचे समोर आले आहे. ही जीवितहानी टाळण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
१६ मार्चपूर्वी सर्व दुचाकीस्वारांनी हेल्मेटची सोय करावी, जेणेकरून दंडात्मक कारवाई आणि प्रवासातील अडथळा टाळता येईल.