गोंदियात भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस उलटली; 11 जणांचा मृत्यू, 29 जण जखमी
schedule29 Nov 24 person by visibility 157 categoryगुन्हे
मुंबई : महाराष्ट्रातील गोंदिया येथे राज्य परिवहन बस उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, गोंदिया-अर्जुनी मार्गावरील बिंद्रवन टोला गावाजवळ शुक्रवारी दुपारी महाराष्ट्र राज्य परिवहनची बस उलटली. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात सुमारे 30 जण जखमीही झाले आहेत.
शिवशाही बस नागपूरहून गोंदियाच्या दिशेने जात असताना पलटी झाली. 'गोंदिया जिल्ह्यात राज्य परिवहन बसला अपघात झाला. ही बस भंडारा आगारातून गोंदियाकडे जात असताना गोंदिया-अर्जुनी मार्गावरील बिंद्रवन टोला गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला उलटली. यात 11 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 29 जण जखमी झाले आहेत.
अधिकारी पुढे म्हणाले की, जखमींना गोंदिया जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्तांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश परिवहन प्रशासनाला दिले आहेत.
अपघात चालकाच्या चुकीमुळे झाल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. चालकाने दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. शिवाय बसचा वेग देखील अधिक होता यातच त्याने एकदम ब्रेक मारल्याने बस उलटून हा अपघात झाल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे.