इचलकरंजीत डंपरच्या धडकेत पती-पत्नी ठार
schedule02 Dec 24 person by visibility 198 categoryगुन्हे
इचलकरंजी : येथील पंचगंगा नदी रस्त्यावरील यशोदा पूलाजवळ डंपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सुनीता संजय वडिंगे (वय ५५) या जागीच ठार झाल्या. तर संजय वडिंगे (वय ५८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातामध्ये पती-पत्नी ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
संजय वडिंगे हे दररोज सकाळी पंचगंगा नदीकिनारी असलेल्या वरदविनायक मंदिरात दर्शनासाठी जात असत. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी देवदर्शन करून परतत असताना हा अपघात घडला. अपघातामुळे पूलाजवळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून वाहतूक सुरळीत केली.
या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या संजय वडिंगे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, उपचार सुरू असतानाच त्यांचाही मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. संजय वडिंगे हे होमगार्ड विभागाचे इचलकरंजी प्रमुख होते. ते १५ दिवसांपूर्वीच सेवानिवृत्त झाले होते.