स्त्री शक्ती दुर्लक्षित करता येणार नाही : खा. छ. शाहू महाराज
schedule28 Nov 25 person by visibility 49 categoryराज्य
कोल्हापूर : देशाच्या सर्वांगीण विकासात स्त्री शक्तीचे महत्त्वाचे योगदान आहे.या शक्तीला दुर्लक्षित करून चालणार नाही असे प्रतिपादन खासदार छ. शाहू महाराज यांनी केले.
येथील NCC गट मुख्यालय (कोल्हापूर) या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराज ट्रेक टेल मोहिमेसाठी मुलींची आज स्वतंत्र तुकडी रवाना झाली. या तुकडीला शाहू महाराजांच्या हस्ते झेंडा दाखवण्यात आला. तत्पूर्वी उपस्थित एनसीसी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, परदेशातील स्त्रियांना अलीकडे समानतेची वागणूक मिळत आहे .तथापि आपल्याकडे छ.शिवाजी महाराजांनी साडे तीनशे वर्षांपूर्वीच स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली ही कौतुकाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी ट्रेकिंग करत असताना स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन करत या मोहिमेत विविध राज्यातील सहभागी झालेल्या विद्यार्थीनींना शुभेच्छा दिल्या.
अंदमान -निकोबार, लक्षद्वीप, पाँडिचेरी, केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थिनी या पदभ्रमंती मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. यावेळी सोनतळी येथे राहणारे नंदकिशोर लकारे हे कोल्हापूर - विशालगड या पदभ्रमंती मोहिमेचे 'साईन मॉडेल' गेली 21 वर्ष स्व:खर्चाने बनवीत असल्याने छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून हे साईन मॉडेल उत्तम झाल्याचे प्रशस्तीपत्र दिले.
याप्रसंगी ब्रिगेडियर आर. के. पैठणकर,कर्नल (डेप्युटी) अनुप रामचंद्रन, 5 महाराष्ट्र बटालियन (कोल्हापूर) कमांडिंग ऑफिसर कर्नल मानस दीक्षित, कर्नल विक्रम नलवडे,लेफ्टनंट कर्नल अंशुमन पाटील आदी उपस्थित होते.