पन्हाळा मुख्य रस्त्याचे उदघाटन; ग्रामस्थ, पर्यटकांकडून समाधान व्यक्त
schedule07 May 22 person by visibility 339 categoryराज्य

पन्हाळा: जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ऐतिहासिक पन्हाळ्याच्या चार दरवाजा समोरील रस्ता खचल्याने वाहतूक थांबली. या रस्त्याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी SIERRASCAPE या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नव्याने तयार करण्यात आलेल्या या मुख्य रस्त्याचे आज उदघाटन पालकमंत्री सतेज पाटील, आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत करण्यात आले .
यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, गेल्या वर्षी पन्हाळा गडावर झालेल्या अतिवृष्टीमुळे खचलेल्या या मुख्य रस्त्याच्या दुरूस्ती करणेसाठी २५ मी. उंचीचा भरावा करणे तसेच रस्त्याच्या डाव्या बाजुला असणाऱ्या सादोबा तलावाच्या सांडव्याचे पाणी भरावातून दरीमध्ये काढणे आवश्यक होते. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक तज्ञांच्या सहभागातून शक्य त्या सर्व पर्यायांचा अभ्यास करण्यात आला.
या रस्त्याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी SIERRASCAPE या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हा रस्ता तयार करण्यात आला आहे. या कामामध्ये चार टप्पे असून प्रत्येक टप्यावर Geogrid व Earthwork असे दीड फुटाचे थर आहेत. सादोबा तलावाचे पाणी भरावातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी Inlet Chambers तयार करणेत आले आहेत.
तसेच पावसाळ्यातील पाणी CASCADE पध्दतीने पायऱ्यांवरून खाली नेणेची तरतूद करण्यात आलेली असून सदरचा प्रयोग हा जिल्हयातील व महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग आहे. यामुळे, ऐतिहासिक आणि पर्यटकांचे आकर्षण असलेला पन्हाळ गड पुन्हा एकदा सर्वांना अनुभवता येणार आहे.
सर्वांनी एकत्रित येत या नवीन तंत्रज्ञानातून केलेले हे काम नक्कीच कौतुकास्पद आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा पर्यटन आराखडा तयार करण्यात येत असून ऐतिहासिक पन्हाळा गडावर जास्तीत जास्त पर्यटक यावेत आणि इथल्या अर्थकारणाला गती मिळावी यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. असेही पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले.
यामध्ये, पन्हाळा ते श्री जोतिबा पर्यंत रोपवे तयार करण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत, तसेच सोलरच्या माध्यमातून वीज उपलब्ध करून पन्हाळा आणि श्री जोतिबा येथे मुबलक पाणी पुरवठा करण्याचा आमचा मानस आहे.
लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त सुरु असलेल्या कृतज्ञता पर्वामधील काही उपक्रम पन्हाळा गडावर घेण्यात येणार आहेत. सोबतच, गडावर आवश्यक सर्व विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यावे आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी खा. धैर्यशील माने, नगराध्यक्षा रुपाली धडेल, कर्णसिंह गायकवाड, बाबासो चौगुले, विजयसिंह माने, शिवाजी मोरे, विशाल महापुरे, प्रकाश पाटील -पोर्लेकर, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडेल, शिवाजी मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

