कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच : पश्चिम महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या दशकांहून अधिक काळ चाललेल्या संघर्षाला अखेर यश : मंत्री चंद्रकांतदादा पाटील
schedule01 Aug 25 person by visibility 256 categoryराज्य

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये होत आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. पश्चिम महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या दशकांहून अधिक काळ चाललेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, न्यायदानाचा मार्ग आता अधिक सुकर होईल, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितद पवार या तिघांनीही मोठे योगदान दिले. त्यामुळे तिघांचेही मनापासून आभार मानतो. तसेच, पश्चिम महाराष्ट्रातील दुर्गम भागातील नागरिकांचा विचार करुन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई जी, महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे जी यांचेही सर्किट बेंचच्या प्रस्तावास मान्यता दिल्याबद्दल अतिशय मनापासून आभार मानतो. नागरिक तसेच वकिलांचेही मन:पूर्वक अभिनंदन!
पुणे बेंचसाठी कायदे तज्ज्ञांच्या स्थानिक शिष्टमंडळानेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागणी केली आहे. त्यावर मार्ग काढण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले आहे. त्यामुळे त्यासाठीही पाठपुरावा करू, अशी ग्वाही यानिमित्ताने देतो. अशी प्रतिक्रिया चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.