वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट
schedule16 Sep 25 person by visibility 46 categoryराज्य

मुंबई : मागासवर्गीय मुला-मुलींच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना समाजातील इतर घटकांप्रमाणे जीवन जगता यावे आणि सर्व प्रकारचे शिक्षण व उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात विभागांतर्गत शासकीय वसतिगृहे ही योजना राबविण्यात येते. झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शासकीय वसतिगृहांतील प्रवेशित विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता तसेच मुलींना स्वच्छता प्रसाधनासाठी (Sanitary Napkin) देण्यात येणाऱ्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही वाढ दि. १ सप्टेंबर २०२५ पासून लागू करण्यात येणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, वसतिगृहे योजनेअंतर्गत राज्यात एकूण ४४१ शासकीय वसतिगृहे कार्यरत असून त्यामध्ये मुलांसाठी २३० व मुलींसाठी २११ वसतिगृहे सुरू आहेत. त्यापैकी मुलांच्या वसतिगृहात २३,५७० विद्यार्थी व मुलींच्या वसतिगृहात २०,३२० विद्यार्थी प्रवेशित असून अशा प्रकारे एकूण ४३,८९० विद्यार्थी या योजनेचा लाभ घेतात. या विद्यार्थ्यांना दैनंदिन खर्चासाठी निर्वाह भत्ता देण्यात येतो.
निर्वाह भत्त्याचे सुधारित दर पुढीलप्रमाणे आहेत. विभागीय स्तर ८०० रुपये वरून १५०० रुपये प्रतिमहा प्रतिविद्यार्थी, जिल्हा स्तर ६०० रुपये वरून १३०० रुपये प्रतिमहा प्रतिविद्यार्थी, तालुका स्तर ५०० रुपये वरून १००० रुपये प्रतिमहा प्रतिविद्यार्थी करण्यात आला आहे. मुलींसाठी स्वच्छता प्रसाधन भत्ता १०० रुपये वरून १५० रुपये प्रतिमहा करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे शासकीय वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होईल असे शिरसाट यांनी यावेळी सांगितले.