कोल्हापूर महापालिकेच्यावतीने बुधवारी मोफत विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
schedule16 Sep 25 person by visibility 169 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : शहरामध्ये १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत केंद्र शासनाची अत्यंत महत्वाकांशी "स्वथ नारी सशक्त परिवार" हे अभियान राबविण्यात येत आहे. "स्वथ नारी सशक्त परिवार " हे अभियान आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत सुरु करण्यात येत आहे. महापालिकेच्यावतीने या मोहिमेमध्ये शहरातील सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, पंचगंगा हॉस्पिटल, ११ नागरी आरोग्य केंद्रे व आरोग्यवर्धिनी केंद्र या आरोग्य संस्थामध्ये महिला व बालकांकरिता विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याचा शिबीराचा शुभारंभ बुधवार, दि.१७ सप्टेंबर २०२५ रोजी सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे होणार आहे.
या अभियानामध्ये असंसर्ग रोग तपासणी (मधुमेह रक्तदाब), महिला व बालकांसाठी पोषण जागरुकता सत्रे, प्रसूतीपूर्व तपासणी, कर्करोग जागरुकता आणि तपासणी, लहान मुलांचे लसीकरण, क्षयरोग जागरूकता आणि तपासणी, स्त्रीरोग तपासणी, बालरोग तपासणी, नेत्ररोग तपासणी, कान नाक घसा तपासणी, दंतरोग तपासणी, त्वचा रोग तपासणी, मानसोपचार तपासणी, रक्त तपासणी, मोफत औषध वितरण, आयुष्मान कार्ड, आभा कार्ड अशा सर्व सेवा व तपासण्या महापालिकेमार्फत मोफत होणार आहेत.
तरी शहरातील सर्व नागरिकांनी या मोफत विशेष आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश पावरा यांनी केले आहे.