कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील चालू असलेली कंपनी ए . एस . ट्रेडर्स ॲन्ड डेव्हलपर्समधील गुंतवणुकदारांकडून आज कंपनीच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयास तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयास निवेदन देण्यात आले आहे. चुकीच्या अफवांमुळे कंपनीचे कार्यालय बंद झाल्याचे गुंतवणुकदार यांनी म्हटले आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, आम्ही गुंतवणुकदार ए.एस कंपनीसोबत २०१७ - १८ पासून सलग्न आहोत . या कालावधीपासून या कंपनीकडून आम्हास स्टॉक मार्केट ट्रेडिंग , कमोडीटी मार्केट ट्रेडिंग या विषयावर प्रशिक्षण मिळत होते व अजूनही मिळत आहे . त्या माध्यमातून आमच्यातले बरेचसे गुंतवणुकदार तसेच त्यांची मुले- मुलीही ट्रेडिंग करत आहेत . परंतू दैनंदिन कामाच्या व्यस्ततेमुळे व मार्केटमधील चढ उतारामुळे ज्यांना शक्य होत नव्हते ते सर्वजण कंपनीला आमच्या तर्फे " तुम्ही ट्रेडिंग करा व आम्हास योग्य तो परतावा दया " अशी विनंती केल्याने व आम्ही कंपनीकडे त्याकरीता गुंतवणुक केल्याने कंपनीने आज पर्यंत आमच्या गुंतवणुकीवर ट्रेडिंग करून आम्हास योग्य तो परतावा वेळोवेळी दिलेला आहे . त्याचप्रमाणे मध्यंतरी कोरोनाच्या कठीण परिस्थितीमध्येही आमचे दैनंदिन रोजगारही ठप्प झाले होते . उत्पन्न शुन्य झाले होते , काहींच्या नोकऱ्या गेल्या. काहींच्या नोकऱ्या होत्या पण पगार नव्हते , अवस्था दयनिय झाली होती . त्यावेळीही कंपनीने आम्हास न चुकता परतावे दिलेले आहेत . आणि त्यामुळे लाखो परिवारांचे जगणे सुसह्य झाले होते .
ए . एस . ट्रेडर्स कंपनीने २०१७पासून आजपर्यंत एकाही व्यक्तीचा परतावा चूकविलेला किंवा टाळलेला नसून त्याबाबत कंपनीने तसे काही गैर कृत्य केल्याबाबत कोणतेही कायदेशिर दप्तरी तक्रार नाही . अशा आम्हा मध्यम वर्गीय लोकांचा आधार असलेल्या कंपनीच्या विरुद्ध काही विक्षीप्त विकृत विचारांच्या लोकांनी कदाचित त्यांच्या स्वार्थापोटी ए.एस.ट्रेडर्स कंपनीची कार्यालये बंद करण्यास भाग पाडलेले आहे.
आमचे सांगणे आहे की , कंपनीमध्ये होणाऱ्या बदलांबाबत किंवा घटनांबाबत कंपनीचे सी. एम.डी व इतर पदाधिकारी वेळोवेळी समक्ष व तसेच ऑनलाईन झूम मिटींगच्या माध्यमातून आम्हा गुंतवणूकदारांची मिटींग घेवून त्यामधून आम्हाला माहिती देत आले आहेत . मागिल एक - दोन महिन्यांपासून आम्हाला काही तांत्रिक व अपरिहार्य कारणांमुळे आमचे परतावे थोडेफार उशीरा होतील या बाबतची पूर्वकल्पना वेळोवेळी कंपनीने दिलेली आहे . त्याप्रमाणे थोडे फार विलंबनाने का होईना चार - पाच दिवसांपूर्वी पर्यंत आम्हा गुंतवणुकदारांना कंपनीकडून परतावे मिळाले आहेत .
आमच्या मधील बरेचसे सामान्य गुंतवणुकदार समाजामध्ये पसरलेल्या गैरसमजामुळे हवालदिल झालेले आहेत . तसेच बळजबरीने बंद पाडलेल्या कार्यालयांमुळे गेल्या चार दिवसांपासून कंपनीस आमचे परतावे देणे अशक्य झाले आहे . ए.एस. ट्रेडर्स अॅण्ड डेव्हलपर्स एल.एल.पी. या कंपनीचे कार्यालयीन कामकाज सुरु करून आमचे परतावे अखंडीत चालू रहावेत याबाबत आपणांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करीत आहोत ,असे निवेदन गुंतवणूकदारांकडून देण्यात आले आहे.