पंढरपुरातील भक्तनिवास शिरोळ तालुक्यातील वारकऱ्यांसाठी मोठा आधार ठरेल : आमदार यड्रावकर
schedule24 Aug 26 person by visibility 166 categoryराज्य
🟠 घोसरवाडच्या वारकऱ्यांचा पुढाकार; पंढरपुरात हक्काच्या जागेवर भक्तनिवासाचे भूमिपूजन
पंढरपूर : शिरोळ तालुक्याला संतपरंपरा आणि वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा लाभली आहे. गावागावांतून भजन, कीर्तन, दिंडी आणि वारीची परंपरा आजही श्रद्धेने जपली जाते. या परंपरेचा वारसा पुढे नेत घोसरवाडच्या वारकऱ्यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे हक्काची जागा घेऊन भक्तनिवास उभारण्याचा घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.
हा भक्तनिवास शिरोळ तालुक्यातील वारकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार असून, त्यासाठी माझ्याकडून एक लाख रुपयांची देणगी देत आहे. तसेच सीएसआर फंडातूनही या भक्तनिवासासाठी निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून, यापुढेही आवश्यक ते सहकार्य करू,असे प्रतिपादन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
घोसरवाड (ता. शिरोळ) येथील विठ्ठल-रुक्माई सहज सेवा ट्रस्टच्या माध्यमातून पंढरपूर येथे ३ गुंठे क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या भक्तनिवासाचा भूमिपूजन सोहळा सोमवारी उत्साहात पार पडला.
याप्रसंगी आमदार यड्रावकर बोलत होते. आषाढी पायी दिंडी सोहळ्याचे यंदा २६ वे वर्ष असून, घोसरवाडच्या वारकरी संप्रदायाने प्रथमच पंढरपूर येथे स्वतःची हक्काची जागा घेऊन भक्तनिवास उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
यावेळी आमदार यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील वारकरी परंपरेचा गौरव करीत शिरोळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये वर्षानुवर्षे भजन, कीर्तन, हरिपाठ, दिंडी सोहळे आणि आषाढी-कार्तिकी वारीची परंपरा सुरू आहे. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अध्यात्मासोबत सामाजिक एकोपा आणि बंधुभावाची शिकवणही गावागावांत रुजविली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
शिरोळ तालुक्यातील वारकरी दरवर्षी मोठ्या संख्येने पंढरपूरच्या वारीत सहभागी होतात. घोसरवाड येथील दिंडीनेही गेल्या २६ वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू ठेवली आहे. वारीदरम्यान पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांच्या निवासाची अडचण लक्षात घेऊन भक्तनिवास उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील वारकऱ्यांसाठी हे भक्तनिवास केवळ निवासाची सुविधा नसून त्यांच्या वारकरी परंपरेचे पंढरपूरमधील कायमस्वरूपी केंद्र ठरणार असल्याचे यड्रावकर यांनी नमूद केले.
यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासो देशमुख यांनीही भक्तनिवासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रणिती भालके यांनीही या उपक्रमाचे स्वागत करून आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, जिल्हा परिषद सदस्या उत्तरादेवी शिंदे, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे, पंचायत समिती सदस्य बाबासो वनकोरे, अविनाश पाटील, विजितसिंह शिंदे सरकार, सरपंच साहेबराव साबळे, कासेगावच्या सरपंच शोभाताई भोसले, कासेगावचे ग्रामसेवक सुजाता भोसले, सिद्वराज शिंदे सरकार, घोसरवाड येथील विठ्ठल रुक्माई सहज सेवा ट्रस्टचे अध्यक्ष कल्लाप्पा पुजारी, उपाध्यक्ष बाबासो पुजारी सर्व संचालक वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.