सीबीएसई साऊथ झोन-२ बॉक्सिंग स्पर्धेचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन
schedule24 Aug 26 person by visibility 233 categoryक्रीडा
कोल्हापूर : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, अतिग्रे येथे सीबीएसई साऊथ झोन-२ बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२६-२७ या प्रतिष्ठित बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता एसजीआय स्टेडियम, अतिग्रे येथे होणार आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते रेनॉल्ड राफेल जोसेफ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संजय घोडावत ग्रुपचे चेअरमन संजय घोडावत हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तसेच संजय घोडावत शिक्षण समूहाचे विश्वस्त विनायक भोसले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील.
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ या राज्यातील विविध सीबीएसई शाळांमधून सहभागी होणाऱ्या युवा बॉक्सरना आपले कौशल्य, जिद्द आणि खेळ प्रदर्शित करण्याची संधी या स्पर्धेत मिळणार आहे. जवळपास 81 शाळांमधील 500 हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन केले आहे.
बॉक्सिंगसारख्या क्रीडाप्रकारातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, संयम, चिकाटी आणि नेतृत्वगुण विकसित होतात. त्यामुळे या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा व्यासपीठाचा अनुभव मिळण्याबरोबरच त्यांच्या क्रीडा कारकिर्दीला नवी दिशा मिळणार आहे. सर्व खेळाडूंसाठी निवासाची, जेवणाची उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सीबीएसईने नेमलेले निरीक्षक व पंच या खेळासाठी उपस्थित असणार आहेत. त्यामुळे सर्व स्पर्धा निपक्षपातीपणाने पार पडतील. असे विचार पत्रकार परिषदेवेळी संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती यांनी व्यक्त केले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ एच.एम नवीन, डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य अस्कर अली, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य नितेश नाडे, क्रीडा संचालक विठ्ठल केंचन्नावर, क्रीडा विभाग, शिक्षक, प्रशिक्षक व कर्मचारी वर्ग परिश्रम करत आहेत.