मुंबईतील जैन मंदिर पुन्हा उभारा, जैन समाजाचा कोल्हापुरात आक्रोश मोर्चा
schedule25 Apr 25 person by visibility 215 categoryराज्य

कोल्हापूर : येथे दक्षिण भारत जैन सभा व सकल जैन समाज यांच्या वतीने मुंबई येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर,मुंबई महापालिका प्रशासनाने जेसीबी लावून पाडल्याच्या निषेधार्थ दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर पर्यंत भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
मंदिर पाडल्याने तेथील जिनमुर्ती व जिनशास्त्र याची विटंबना व अवहेलना झाली ही गोष्ट अतिशय दुर्दैवी असून संपूर्ण सकल जैन समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत.त्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी आज जाहीर आक्रोश मोर्चाचे आयोजन सकल जैन समाजाच्या वतीने करणेत आले होते.
लढेंगे और जितेंगे, मंदिर वही बनायेंगे, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा, जैन समाजावर अन्याय करणाऱ्यांचा धिक्कार असो, धर्मावरील अन्याय सहन करणार नाही, अल्पसंख्याकांवरील अन्याय बंद करा अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे दिलेले निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्विकारले. दिलेल्या निवेदनामध्ये खालील मागण्या करण्यात आल्या आहेत. विले पार्ले पूर्व मुंबईतील जैन मंदिर उध्वस्त करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे तातडीने निलंबन करा, जैन मंदिराचे त्याच जागेवर पुनर्निमाण करण्याचा आदेश मुंबई महापालिका आणि नगरविकास खात्याला द्यावा, सर्व जैन तीर्थक्षेत्रे, जैन मंदिरे, साधू-साध्वी, श्रावक-श्राविका यांचे संरक्षण करा, त्यांच्याशी संबंधित समस्यांचे निराकरण करावे आदी मागण्याचा समावेश आहे.
या मोर्चामध्ये माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, आमदार अमल महाडिक, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब पाटील, खजिनदार संजय शेटे, जैन महामंडळाचे अध्यक्ष आणि अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी, सहखजिनदार अरविंद मजलेकर, दिगंबर जैन बोर्डिंगचे चेअरमन सुरेश रोटे, माजी नगरसेवक राजू लाटकर, राहुल चव्हाण, सकल जैन समाजातील बंधू भगिनी आणि तरुण बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.