मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून पहलगाम हल्ल्यातील मृत पर्यटकांना श्रद्धांजली
schedule25 Apr 25 person by visibility 121 categoryराज्य

मुंबई : जम्मू व काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दुर्देवी मृत्यू पावलेल्या भारतीय पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इंग्लंडमधील लंडन शहरातील इंडिया हाऊस येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या श्रद्धांजली सभेत मृत्यू झालेल्या भारतीय पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्यासह यूके मधील भारताचे उच्चायुक्त उपस्थित होते. मंत्री शिरसाट हे ‘डॉ. बी. आर. आंबेडकर ग्लोबल व्हिजन रिइमॅजनिंग : जस्टीस, इक्वलिटी अँड डेमॉक्रॅसी’ या जागतिक परिषदेसाठी लंडन येथे गेले आहेत.
यावेळी मंत्री शिरसाट म्हणाले, पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. दहशतवाद हा मानवतेसाठी घातक असून अशा घटनांमुळे देशाचे मनोबल खचणार नाही. या दुर्घटनेत जखमी झालेल्या पर्यटकांशी प्रशासनाच्या वतीने संपर्क करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने त्यांची निवासव्यवस्था आणि पुढील प्रवासासाठी आवश्यक ते समन्वय केला जात आहे. मंत्री श्री. शिरसाट यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दुर्देवी मृत्यू झालेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. भारतीय उच्चायुक्त यांच्यावतीने ही श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती.