धक्कादायक: चैनीसाठी नातवानेच केला आजीचा 'स्लो पॉयझनिंग'ने खून; कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखे कडून छडा
schedule21 Feb 26 person by visibility 232 categoryगुन्हे
गंगावेश येथील शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये ७२ वर्षीय उषा मारुती भिऊंगडे यांचा झालेला मृत्यू नैसर्गिक नसून, त्यांच्या पोटच्या नातवानेच दागिन्यांच्या हव्यासापोटी केलेला खून असल्याचे उघड झाले आहे. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या प्रकरणाचा तांत्रिक तपास करून आरोपी नातू प्रेम परशराम भिऊंगडे (वय २०) याला अटक केली आहे.
१६ फेब्रुवारी रोजी उषा भिऊंगडे मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांच्या अंगावरील सोन्याच्या ६ पाटल्या आणि साखळ्या गहाळ असल्याने घातपाताचा संशय होता. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकाने तपास केला असता, घटनेच्या दिवशी प्रेम घरात येऊन गेल्याची माहिती मिळाली. पोलिसी खाक्या दाखवताच प्रेमने गुन्ह्याची कबुली दिली.
चैनीसाठी पैशांची गरज असल्याने प्रेमने आजीच्या चहातून विषारी द्रव्य दिले. आजीचा मृत्यू नैसर्गिक वाटावा यासाठी त्याने हा बनाव रचला होता. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी पथकाचे कौतुक केले आहे.