कोल्हापूर-सांगली महामार्ग भूसंपादन: जमिनीला २ गुणांक कायम, ५ दिवसांत संयुक्त मोजणी पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
schedule29 Dec 25 person by visibility 57 categoryराज्य
कोल्हापूर : कोल्हापूर ते सांगली राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ च्या चोकाक ते अंकली विभागाच्या भूसंपादन प्रक्रियेला आता वेग आला आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादित करावयाच्या खाजगी जमिनींना २ गुणांक कायम ठेवण्याची अनुमती जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी प्रदान केली आहे. महाराष्ट्र शासनाने नुकत्याच निर्गमित केलेल्या निर्देशांनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे भूसंपादनास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
या प्रकल्पाच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित शासकीय विभागांना पुढील पाच दिवसांच्या आत, म्हणजेच दि. ०२.०१.२०२६ पर्यंत, संयुक्त मोजणीचे कार्य पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. या मोजणीनंतर दि. ०९.०१.२०२६ पर्यंत कलम ३डी अंतर्गत सार्वजनिक अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे.
विशेषतः तमदलगे, निमशिरगाव, उमळवाड, उदगाव, हातकणंगले, अतिग्रे आणि मजले या गावांमधील मोजणी कार्य लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संयुक्त मोजणी कार्यात कोणीही अडथळा निर्माण करू नये आणि शासनास सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, कोल्हापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे. मोजणी कार्यास विरोध करणाऱ्यांविरुद्ध सक्त कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शासकीय विभागांना दिले आहेत.
या बैठकीस भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस. एस. कदम, उपप्रबंधक गोविंद बैरवा आणि उप अभियंता सोहम भंडारे उपस्थित होते.
तसेच इचलकरंजी उपविभागीय अधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे, पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड, हातकणंगलेचे तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, शिरोळचे तहसीलदार संजय माळी यांसह भूमी अभिलेख, सार्वजनिक बांधकाम, वन विभाग आणि कृषी विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते.





