महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सी.पी.टी.पी. २०११ बॅच प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची ‘गोकुळ’ दूध संघाला अभ्यास भेट
schedule15 Dec 25 person by visibility 83 categoryउद्योग
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) येथे आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सी.पी.टी.पी. बॅच २०११ मधील महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे प्रशिक्षण घेत असलेले उपजिल्हाधिकारी, उप पोलिस अधीक्षक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे अभ्यास भेट दिली.
या भेटीवेळी गोकुळ संघाच्या दूध संकलनापासून प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, वितरण व्यवस्था तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, स्वच्छता, नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि पारदर्शक प्रशासन या बाबींचे अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी भेट दिलेल्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी गोकुळ दूध संघाच्या एकूण कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. गोकुळ दूध संघ ही सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था असून सहकाराच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकरी, कर्मचारी व संबंधित सर्व घटकांचा सर्वांगीण विकास कसा साधता येतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गोकुळ दूध संघ असल्याचेही अधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केले.” सहकार क्षेत्रात गोकुळ संघाने उभा केलेला आदर्श इतर सहकारी संस्थांसाठी मार्गदर्शक ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी सहकार, प्रशासन आणि विकासात्मक योजनांच्या अमलबजावणी संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. या अभ्यासभेटीमुळे भविष्यात प्रशासकीय कामकाजात निश्चितच मदत होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, “महाराष्ट्र लोकसेवा आयोग CPTP बॅच २०११ च्या प्रशिक्षित अधिकाऱ्यांची गोकुळ दूध संघाला दिलेली भेट आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. अशा अभ्यासभेटींमुळे प्रशासन आणि सहकार क्षेत्र यांच्यातील समन्वय वाढून ग्रामीण व कृषी विकासाला निश्चितच चालना मिळेल.”
यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, दुग्ध विकास अधिकारी प्रकाश आवटी, ए.एस.माळवदे, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, (यशदा) पुणे येथे प्रशिक्षण घेत असलेले सर्व अधिकारी उपस्थित होते.





