महादेवीला नांदणीला परत पाठवण्यासाठी महाराष्ट्र सरकार, नांदणी जैन मठ आणि वनतारा एकत्रितपणे न्यायालयाला विनंती करणार
schedule06 Aug 25 person by visibility 311 categoryराज्य

कोल्हापूर - महादेवी (माधुरी) ला नांदणीला परत पाठवण्यासाठी महाराष्ट्र सरकार, नांदणी जैन मठ आणि वनतारा एकत्रितपणे न्यायालयाला विनंती करणार असल्याची घोषणा वनतारा प्रशासनानं कोल्हापूर मध्ये केली. "माधुरी" हत्तीणच्या बाबतीत जनतेच्या भावना, पर्यावरणीय जबाबदारी आणि न्यायिक प्रक्रिया यांचं सुंदर संतुलन राखत सकारात्मक निर्णयाकडे वाटचाल सुरु आहे.
कोल्हापुरातील जनतेसाठी ही नक्कीच दिलासादायक बातमी आहे. या याचिकेला पेटा (PETA) आणि एचपीसी (HPC) यांचा पाठिंबा असून, यामध्ये हत्तीणची मालकी नांदणी मठाकडेच राहणार आहे, मात्र वैद्यकीय सेवा आणि देखभाल वनताराकडून केली जाणार आहे.
याबाबत नांदणी मठ, वनतारा आणि महाराष्ट्र राज्य सरकार एकत्र येऊन संयुक्त याचिका सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. हा एक सकारात्मक टप्पा आहे.
विवान करानी यांनी स्पष्टपणे सांगितले की, हत्तीणचे पुनर्वसन नीट आणि प्रेमाने केले जाईल. जनतेच्या भावना लक्षात घेऊन हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत आणि "तुमची माधुरी लवकरच कोल्हापुरात येईल", अशी आश्वासक माहितीही देण्यात आली आहे.
महास्वामींनी सांगितले की, वनतारासोबत झालेली चर्चा समाधानकारक आहे. माधुरी हत्तीण परत येईपर्यंत वनताराने आम्हाला मदत करावी, अशी आमची विनंती आहे.
▪️ कोल्हापूरकरांचे अभिनंदन!
माधुरी हत्तीणीच्या न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून परत येण्याचा निर्णय हा कोल्हापूरातील लोकांच्या एकजूटीचा आणि लोकभावनेचा आहे. या सामुहीक लढ्याला दिलेल्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. माधुरीला कोल्हापुरात पुनर्वसन करण्याचा वनतारा व्यवस्थापनेच्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. अशी प्रतिक्रिया विधान परिषद गटनेते, आमदार सतेज पाटील यांनी दिली.